नवी दिल्ली : हैदराबाद hyderabad महिला पशुवैद्य बलात्कार आणि हत्येचे पडसाद साऱ्या देशभरात उमटताना दिसत आहेत. महिलांशी होणारी ही दुष्कृत्य थांबवत गुन्हेगारांना कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी देशातील जनसमुदाय करत आहेत. विविध आंदोलनं आणि मोहिमांच्या माध्यमातून सरकार दरबारी कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. यामध्ये सर्वत क्षेत्रातील दिग्गजांचा सूरही मिसळला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात महिलांच्या इभ्रतीशी आणि त्यांच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं ठणकावून सांगितलं आहे.
'महिलांच्या सुरक्षेबाबत सरकारनं कायदा केला आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. मात्र सरकारवरच सर्व काही सोडून चालणार नाही', असं विधान भागवत यांनी केलं. दिल्लीत गीता प्रेरणा महोत्सवात ते बोलत होते. हैदराबाद अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भागवतांचं हे विधान अतीव महत्त्वाचं ठरत आहे. महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोण शुद्ध हवा. त्याची सुरुवात आपल्या घरातून व्हावी, असंही भागवत म्हणाले.
'माझ्या निरपराध मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना जिवंत जाळा'
भगवत गीतेचा आधार देत कर्म आणि समाजाविषयी त्यांनी भाष्य केलं. महिलांना सक्षम करण्यासाठी समाजात त्यांचा आदर केला जाण महत्त्वाचं असल्याची बाब त्यांनी मांडली. 'प्रशासन अशा परिस्थितीमध्ये कोणती पावलं उचलायची आहेत ती उचलणारच आहे', असं म्हणत हे प्रसंग का घडतात यावर विचार करण्याची समाजाचीही जबाबदारी असल्याची बाब त्यांनी यावेळी उपस्थितांसमोर मांडली.
प्रत्येक कुटुंबामध्ये अशा प्रकारल्या मुल्यांचं पालन केलं गेलं पाहिजे जेथे त्या घरातील मुलं महिलांचा आदर करायला कधीच विसरणार नाहीत आणि कायम त्यांच्याकडे शुद्ध नजरेने पाहतील. प्रत्येक कुटुंबातच मुलांना स्वत:च्या अपेक्षांर आणि एकंदरच स्वत:वर नियंत्रण ठेवण्याची शिकवण दिली गेली पाहिजे, असे स्पष्ट विचार भागवत यांनी मांडले.