म्यानमारने भारतीय हद्दीत उभारला पिलर; सरकारच्या नाकर्तेपणावर काँग्रेसची टीका

या सगळ्या प्रकरणानंतर स्थानिक राजकीय पक्षांनी या परिसराला भेटही दिली. 

Updated: Jul 7, 2018, 12:38 PM IST
म्यानमारने भारतीय हद्दीत उभारला पिलर; सरकारच्या नाकर्तेपणावर काँग्रेसची टीका title=

इंफाळ: भारताचा शेजारी असलेल्या म्यानमारने अनधिकृतपणे भारतीय हद्दीत बॉर्डर पिलर उभारल्याची बाब समोर आली आहे. यावरून काँग्रेसने केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. म्यानमार नाराज होऊ नये म्हणून केंद्र सरकार ही आगळीक खपवून घेत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, मणिपूरच्या क्वाथा परिसरात हा प्रकार घडलाय. या सीमावर्ती परिसरात म्यानमारने सीमा दर्शवणारे (बॉर्डर पिलर) उभारण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, यापैकी एक पिलर भारतीय हद्दीच्या ३ किलोमीटर आतमध्ये उभारण्यात आला आहे. यावर स्थानिक लोकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यानंतर मणिपूर सरकारकडून तात्काळ या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली. मात्र, म्यानमारला खूश ठेवण्यासाठी सरकार या आगळीकीकडे दुर्लक्ष करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. 

या सगळ्या प्रकरणानंतर स्थानिक राजकीय पक्षांनी या परिसराला भेटही दिली. त्यावेळी आसाम रायफल्स आणि पोलीस दलातील जवान या पिलरभोवती पहारा देत होते. हाच धागा पकडत विरोधी पक्षांनी केंद्र सरकार भारताची जमीन म्यानमारला देत असल्याचा आरोप केलाय. मात्र, मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. भारत आणि म्यानमारच्या पथकांनी या परिसराची पाहणी केली होती. त्यानंतरच पिलर उभारण्याचे स्थान निश्चित करण्यात आले, असे बीरेन सिंह यांनी सांगितले.