रांची : झारखंडच्या देवघर रोपवेवर (Deoghar Ropeway Accident) अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या बचाव कार्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. या बचाव कार्यादरम्यान एक जवान लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून खाली पडला. दुर्देवाने या अपघातात जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. (rescue of people trapped on deoghar ropeway of Jharkhand is going on continuously major incident happened during rescue operation)
देवघर जिल्ह्यातील मोहनपूर पोलीस ठाणे हद्दीतील त्रिकुट डोंगरावर रोपवेच्या अपघातानंतर ट्रॉलीमध्ये 48 जण लटकले होते. या 48 पैकी 32 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली. वायुसेना, आयटीबीपी, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकाच्या अथक प्रयत्नांमुळे आतापर्यंत 32 जणांचं जीवा वाचला.
हेलिकॉप्टरला लटकलेले लष्कराचे जवान दोरीच्या साहाय्याने एकामागून एक लोकांना ट्रॉलीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अजूनही जवळपास 15 जण अडकल्याची माहिती आहे. तसेच या अपघातात आतापर्यंत एकूण 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
रविवारी सायंकाळी 6 च्या सुमारास झालेल्या अपघातानंतर 12 ट्रॉलींमध्ये 48 जण अडकले होते. या लोकांनी संपूर्ण रात्र ट्रॉलीवर काढली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रविवारी त्यांना ट्रॉलीमधून खाली उतरवण्यात काही जणांना यश आले. रात्र असल्याने रविवारी बचावकार्य थांबवावं लागलं होतंय.
सोमवारी सकाळी लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू झालं. मात्र रोपवेच्या तारांमुळे मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. ट्रॉलीमध्ये अडकलेल्या लोकांपर्यंत बिस्कीट आणि पाण्याची पाकिटे ड्रोनद्वारे पोहोचवली गेली.