लालूंना हायकोर्टाचा जोरदार दणका... पुन्हा तुरुंगात रवानगी!

मेडिकल ग्राऊंडवर लालूंना २७ ऑगस्टपर्यंत जामीन मंजूर करण्यात आला होता

Updated: Aug 24, 2018, 01:28 PM IST
लालूंना हायकोर्टाचा जोरदार दणका... पुन्हा तुरुंगात रवानगी! title=

रांची : चारा घोटाळ्यातील वेगवेगळ्या प्रकरणांतील दोषी लालू प्रसाद यादव यांचा अस्थायी जामिनाचा (प्रोव्हिजनल बेल) अर्ज रांची हायकोर्टानं फेटाळलाय. राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) सुप्रीमो लालूंना ३० ऑगस्ट रोजी हजर होण्याचे आदेश दिलेत. आता जेल मॅन्युअलनुसार त्यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत.

मेडिकल ग्राऊंडवर लालूंना २७ ऑगस्टपर्यंत जामीन मंजूर करण्यात आला होता. ही मुदत संपण्याच्या आधीच न्यायाधीश अरपेश कुमार सिंह यांच्या न्यायालयासमोर लालूंच्या वकिलांनी मेडिकल ग्राऊंडवर जामीनाची मुदत वाढवण्याची मागणी केली होती. ही मागणी कोर्टानं फेटाळून लावलीय. 

लालूंवर जून महिन्यात एक शस्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना जवळपास तीन महिने आराम करण्याचा सल्ला दिला होता. लालूंना हाय ब्लड प्रेशर, डायबेटिज, किडनी तसंच हृदयासंबंधी समस्या आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर रांचीच्या 'एम्स' रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यामुळे लालूंनी चांगल्या उपचारांसाठी जामीनअर्ज दाखल केला होता. त्यानंतर ते सतत प्रोव्हिजनल जामीनावर बाहेरच आहेत.