अरुण जेटली यांच्या नावे सुरु होणार कर्मचारी कल्याण योजना

जेटली यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या निवृत्तीवेतनातून या योजनेसाठी निधी देण्यात येणार आहे.

Updated: Jul 15, 2020, 04:06 PM IST
 अरुण जेटली यांच्या नावे सुरु होणार कर्मचारी कल्याण योजना title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : राज्यसभा Rajya Sabha सचिवालयाने भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली Arun Jaitley यांच्या नावावर कर्मचारी कल्याण योजना सुरु होत आहे. राज्यसभेचे सदस्य असलेल्या जेटली यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या निवृत्तीवेतनातून या योजनेसाठी निधी देण्यात येणार आहे.

मंगळवारी देण्यात येणाऱ्या एका अधिकृत माहितीनुसार, या योजनेंतर्गत सचिवालयातील 'सी' गटातील कर्मचार्‍यांच्या मुलांना उच्च तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणासाठी तीन शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त मृत्यू आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत कर्मचार्‍यांना आर्थिक मदत दिली जाईल.

अरुण जेटली यांची मुलगी सोनाली जेटली बक्षी यांनी एका ट्विटद्वारे म्हटलं आहे की, 'माझे वडील अरुण जेटली यांना असा विश्वास होता की, शिक्षण केवळ एक अधिकार नाही तर न्यू इंडियाचं स्वप्न साकार करण्यासाठी ते आवश्यक देखील आहे. म्हणूनच, आम्ही त्यांची पेन्शन राज्यसभा सचिवालयातील 'सी' गटातील कर्मचार्‍यांना दान केली आहे. जेणेकरून कर्मचार्‍यांच्या मुलांना कल्याणकारी योजना आणि शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळू शकेल. वडिलांच्या आदर्शांचा आदर करण्याचा हा उत्तम मार्ग आहे', असंही त्या म्हणाल्या.

अरुण जेटली यांच्या पत्नी संगीता यांनी गेल्या वर्षी राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकया नायडू यांना, त्यांना मिळणारी पेन्शन सचिवालयातील कर्मचार्‍यांसाठी वापरण्याचं आवाहन केलं होतं. नायडू यांच्या निर्देशांच्या आधारे सचिवालयाने, सी गटातील कर्मचार्‍यांसाठी 'अरुण जेटली आर्थिक सहाय्य योजना' तयार केली आहे.