बोअरवेलमध्ये पडून दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू; शेतमालकाने स्वतःलाही संपवलं

Rajasthan Crime : राजस्थानमध्ये एका शेतात बोअरवेलसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलांच्या मृत्यूनंतर शेतमालकानेही स्वतःला संपवलं आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 23, 2023, 05:04 PM IST
बोअरवेलमध्ये पडून दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू; शेतमालकाने स्वतःलाही संपवलं title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

Crime News : राजस्थानच्या (Rajasthan Crime) अलवर जिल्ह्यातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. राजस्थानमधील (Rajasthan News) अलवर जिल्ह्यातील कठुमार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छोटा भदिरा गावात शेतातील बोअरवेलमध्ये पडल्याने एकाच कुटुंबातील दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. या मुलांच्या मृत्यूनंतर शेत मालकानेही गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (Rajasthan Police) घटनास्थळी पोहचून तपासकार्य सुरु केले आहे.

अलवर जिल्ह्यातील कठुमार पोलीस स्टेशन हद्दीतील छोटा भदिरा गावातील एका शेतात बुडून एकाच कुटुंबातील दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक कथुमार अशोक चौहान, पोलीस ठाण्याचे अधिकारी ओमप्रकाश मीना यांनी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची पाहणी करून कुटुंबीयांची तक्रार नोंदवली आहे. तर दुसरीकडे पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने शेतमालक साहेब सिंह याने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

छोटा भदिरा गावात साहेब सिंह याच्या शेतात बनवलेल्या खड्ड्यात बुडून या मुलांचा मृत्यू झाला. ही घटना 19 जुलै रोजी संध्याकाळी घडली आहे. बोअरिंगसाठी शेतात खड्डा खोदण्यात आला, त्यात पावसाचे पाणी भरले होते. बुधवारी दोन्ही मुले त्यात पडली. त्यानंतर गुरुवारी दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, पोलीस आणि इतर कारवाईच्या भीतीने कंटाळून  साहेब सिंह यानेही गुरुवारी रात्री आत्महत्या केली.

पोलिस उपअधीक्षक अशोक चौहान यांनी सांगितले की, कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र जाटव यांचा 9 वर्षीय मुलगा लवकुश जाटव आणि त्याच कुटुंबातील सत्येंद्र जाटव यांचा मुलगा गोलू उर्फ ​​यशांक जाटव हे बुधवारी नेहमीप्रमाणे त्यांच्या शेतात फिरायला आणि खेळायला गेली होती. त्यांच्या शेताजवळील साहेब सिंह जाटव यांच्या शेतात बोरिंगसाठी केलेल्या खड्ड्यावर दोन्ही मुले खेळू लागली. पावसाचे पाणी खड्ड्यात भरल्याने व माती गुळगुळीत असल्याने पाय घसरल्याने दोघेही बुडाले. त्यावेळी तिथे कोणीच नव्हते. त्यानंतर काही वेळातच दोन्ही मुलांचा बुडून मृत्यू झाला. 

मुले बराचवेळ घरी न आल्याने कुटुंबिय काळजीत पडले आणि त्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन्ही मुलांचे मृतदेह खड्ड्यात तरंगताना आढळून आले. दोन्ही मुलांचे मृतदेह कठुमार जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले होते. त्यानंतर दोघांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.