मृत्यूच्या काहीच सेकंद लांब होता हा व्यक्ती, रेल्वे CCTV व्हिडीओ अंगावर काटा आणणारा

या घटनेचा हा व्हिडीओ रेल्वेने (Ministry Of Railways) सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यानंतर हा व्हिडीओ सर्वत्र वाऱ्यासारखा पसरला.

Updated: Mar 31, 2022, 07:52 PM IST
मृत्यूच्या काहीच सेकंद लांब होता हा व्यक्ती, रेल्वे CCTV व्हिडीओ अंगावर काटा आणणारा title=

बिहार : बिहारमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथील रेल्वे स्टेशनवर एक व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी ट्रेनच्या इंजिनवरती चढला. परंतु रेल्वे कर्मचाऱ्याने वेळीच या गोष्टीकडे लक्ष देऊन आणि आपल्या जिवावर खेळून या व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. या घटनेचा हा व्हिडीओ रेल्वेने (Ministry Of Railways) सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यानंतर हा व्हिडीओ सर्वत्र वाऱ्यासारखा पसरला. रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, बिहारमधील दानापूर रेल्वे स्थानकावरील तिकीट तपासणी कर्मचार्‍यांनी याव्यक्तीला इंजिनवर चढण्याचा प्रयत्न करताना पाहिल्यानंतर लगेच त्याचे प्राण वाचवण्यासाठी धाव घेतली.

कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीची सुटका करून जवळच्या रुग्णालयात नेले. रेल्वे मंत्रालयाने ट्विटरवर लिहिले, 'भारतीय रेल्वे कर्मचाऱ्याने मानवता आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श ठेवला! पूर्व मध्य रेल्वेच्या दानापूर स्थानकावरील तिकीट तपासणी कर्मचाऱ्याने स्वत:च्या जीवावर खेळून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला वाचवून रुग्णालयात नेले."

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती रेल्वेच्या इंजिनवर झोपला आहे आणि एक सफेद कपड्यातील व्यक्ती त्या इंजिनवर चढून या व्यक्तीला रेल्वेच्या छतापासून खाली ओढत आहे. हे दृश्य पाहाताना देखील अंगावर काटा आणणारं आहे. तर विचार करा की, तेथे उपस्थीत तो रेल्वे कर्मचारी आपल्या जिवावर खेळून त्या व्यक्तीचे प्राण कसे बरं वाचवत असेल.

जर या आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा चुकून जरी हात रेल्वेवरील तारेला लागला असता, तर तो व्यक्ती तर स्वत: गेलाच असता शिवाय त्याला वाचवायला जाणाऱ्या व्यक्तीच्याही ते जिवावर बेतलं असतं. परंतु क्षणाचाही विचार न करता या रेल्वे कर्मचाऱ्याने या व्यक्तीचे प्राण वाचवले आहे.

या कर्मचाऱ्याने आत्महत्या करायला गेलेल्या व्यक्तीला खाली खेचलं आणि त्यावेळी तेथे उपस्थीत असलेल्या लोकांनी त्याला झेललं, हा व्यक्ती बेशुद्ध पडल्यामुळे नंतर त्याला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानकावरील CCTV कॅमेरामध्ये कैद झाली आहे. परंतु या व्यक्तीने ही आत्महत्या का करण्याचा प्रयत्न केला हे समोर आलेलं नाही.