लष्कराला 2 दिवसांत मणिपूर हिंसा थांबवणं शक्य होतं, पण 'त्यांना' आग पेटती ठेवायचीय -राहुल गांधी

Rahul Gandhi Reaction on Mnaipur: फोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे. पंतप्रधानांना मणिपूरला पेटवायचे आहे. त्यांना देशात काय चाललंय हे माहिती नाही. पंतप्रधानांनी खिल्ली उडवायला नको होती, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 11, 2023, 03:37 PM IST
लष्कराला 2 दिवसांत मणिपूर हिंसा थांबवणं शक्य होतं, पण 'त्यांना' आग पेटती ठेवायचीय -राहुल गांधी title=

Rahul Gandhi Reaction on Mnaipur:  मणिपूर हिंसेबद्दल बोलताना पंतप्रधान हसत होते असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.  मी मणिपूरमध्ये जे पाहिले ते लोकसभेत मांडले. मणिपूरमध्ये भारताला संपवण्यात आल्याचे मी म्हणालो. पण याचा विपर्यास केला गेल्याचे ते म्हणाले. मी उथळपणे बोललो नाही, असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत बोलताना मणिपूरच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. यानंतर राहुल गांधी यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी हल्लाबोल केला होता.

मणिपूर महिनोंमहिने जळतोय. मणिपूरचे दोन भाग झाले आहेत हे सत्य आहे.  पंतप्रधान मणिपूरला जात नाहीत, त्यांनी किमान त्यावर बोलावं तरी अशी अपेक्षा यावेळी राहुल गांधी यांनी व्यक्त केली.फोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे. पंतप्रधानांना मणिपूरला पेटवायचे आहे. त्यांना देशात काय चाललंय हे माहिती नाही. पंतप्रधानांनी खिल्ली उडवायला नको होती, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. 

सैन्याला सांगितल्यास मणिपूर 2 दिवसात शांत होईल. मणिपूरचं विभाजन म्हणजे भारतमातेची हत्या असल्याचे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधानांनी मणिपूरला जायला हवं होतं, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांना मणिपूर पेटतं ठेवायचं आहे.तिथली आग त्यांना विझू द्यायची नाहीय, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. 

मोदींनी ठरवलं तर मणिपूर 3 दिवसात शांत होईल. लष्कराला 2 दिवसांत मणिपूर हिंसा थांबवणं शक्य होतं, पण 'त्यांना' आग पेटती ठेवायचीय असा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला. 

'मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली आहे. आपण देशद्रोही आहात. तुम्ही देशप्रेमी, देशभक्त अजिबात नाही. म्हणूनच तुमचे पंतप्रधान मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत. तुम्ही भारतमातेचे रक्षक नाही, तर हत्यारे आहात," असा संताप राहुल गांधी यांनी व्यक्त केला. दरम्यान लोकसभा अध्यक्षांनी भारतमातेसंबंधी आदराने बोलावं असा सल्ला दिला. त्यावर राहुल गांधींनी आक्षेप घेतला होता.

भारतमाता माझी आई आहे. एक आई इथे बसली आहे आणि दुसऱ्या आईला तुम्ही मणिपूरमध्ये मारलं आहे. जोवर तुम्ही हिंसा बंद करत नाही तोवर तुम्ही माझ्या आईची हत्या करत आहात. लष्कर एक दिवसात मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करेल. पण तुम्ही तसं करु इच्छित नाही. जर नरेंद्र मोदी हिंदुस्थानचा आवाज ऐकत नसतील तर कोणाचा आवाज ऐकतात. ते फक्त दोन लोकांचा आवाज ऐकतात," असा आरोप राहुल गांधी यांनी केली. 

लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना रावणाशी केली होती. राहुल गांधी म्हणाले की, "रावण फक्त दोन कुंभकर्ण आणि मेघनाद यांचं ऐकत होता. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त अमित शाह आणि अदानी यांचंच ऐकतात. लंकेला हनुमानाने नाही, तर रावणाच्या अहंकाराने जाळलं होतं. प्रभू श्रीरामाने रावणाला मारलं नाही, तर त्याच्या अहंकाराने त्याला मारलं. तुम्ही संपूर्ण देशात केरोसिन फेकत आहात. मणिपूरमध्ये केरोसिन फेकलं आणि काडी ओढली. आता तुम्ही हरियाणातही तेच करत आहात. तुम्ही संपूर्ण देश जाळत आहात, असे राहुल गांधी लोकसभेत म्हणाले होते.