नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना बुधवारी अमेठीतील शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी शेतकऱ्यांनी राहुल गांधी यांच्यासमोर 'इटलीला परत जा' अशा घोषणा दिल्या. येथील राजीव गांधी फाऊंडेशनच्या ताब्यातील जमिनीच्या मुद्द्यावरून हा वाद निर्माण झाला. या संस्थेमध्ये एकतर शेतकऱ्यांना नोकऱ्या द्याव्यात अथवा शेतकऱ्यांना ही जमीन परत करावी, अशी मागणी संजय सिंह या व्यक्तीने केली. एवढेच नव्हे तर आम्ही राहुल गांधी यांनी आमची खूपच निराशा केली आहे. त्यामुळे त्यांनी इटलीला परतावे. त्यांनी आमची जमीन बळकावली आहे, असेही संजय सिंह यांनी म्हटले.
मतदार प्रियंका गांधींमध्ये इंदीराजींची प्रतिमा पाहतील- शिवसेना
शेतकऱ्यांकडून ज्या जमिनीसंदर्भात ही मागणी करण्यात आली आहे, ती जमीन सम्राट सायकल कारखान्याची होती. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी या कारखान्याचे उद्घाटन केले होते. मात्र, १९८० साली जैन बंधूंनी कंपनी सुरू करण्यासाठी कौसार येथील ही जमीन विकत घेतली होती. मात्र, ही कंपनी प्रत्यक्षात न येऊ शकल्याने न्यायालयाने ही जमीन उत्तर प्रदेश औद्योगिक विकास प्राधिकरणाकडे सोपवण्याचे आदेश दिले होते. यानंतर प्राधिकरणाने २०१४ मध्ये २० कोटींच्या कर्ज वसुलीसाठी या जागेचा लिलाव केला होता. तेव्हा राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टने ही जमीन विकत घेतली. ही गोष्ट ध्यानात आल्यानंतर संपूर्ण लिलाव प्रक्रिया अवैध ठरवण्यात आली. तसेच गौरीगंज उपजिल्हाधिकारी न्यायालयाने ही जमीन पुन्हा सम्राट सायकल कारखान्याकडे सोपविण्याचे आदेश दिले होते. मात्र, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टने अद्याप या जमिनीवरील ताबा सोडलेला नाही.