नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील पहिलीवहिली पत्रकार परिषद शुक्रवारी दिल्लीत घेतली. भाजपकडून ही पत्रकार परिषद असल्याचा दावा केला जात असला तरी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी एकतर्फी संवादच साधला. यावेळी कोणत्याही पत्रकाराला प्रश्न विचारून देण्यात आले नाहीत. हाच धागा पकडत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. राहुल यांनी ट्विट करून म्हटले की, अभिनंदन मोदीजी, तुमची पत्रकार परिषद खूपच उत्तम होती.पत्रकार परिषद घेतल्याचा देखावा निर्माण करून तुम्ही अर्धे काम केलेत. मात्र, पुढच्यावेळी अमित शहा तुम्हाला एकदोन प्रश्नांची उत्तरे देण्याची मुभा देवोत. बाकी तुमची कामगिरी उत्तम झाली, अशी खोचक टिप्पणी राहुल यांनी केली.
विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्या या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसकडून त्यांच्या ट्विटर हँडलवरील प्रोफाईल पिक्चरही बदलण्यात आला. काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर आता महात्मा गांधी यांचा फोटो लावण्यात आला आहे. भाजपच्या भोपाळ मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी महात्मा गांधीजी यांचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले होते. नथुराम गोडसे हे देशभक्त होते, आहेत आणि कायम राहतील, असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले होते त्यांच्या या विधानावरून बराच वाद झाला होता. यानंतर भाजपने बचावात्मक भूमिका घेत तात्काळ साध्वी प्रज्ञा यांना माफी मागण्याचे आदेशही दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपण या वक्तव्यासाठी साध्वी प्रज्ञा यांना कदापि माफ करणार नाही, असे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
Congratulations Modi Ji. Excellent Press Conference! Showing up is half the battle. Next time Mr Shah may even allow you to answer a couple of questions. Well done!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 17, 2019
दरम्यान, आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्रकार परिषदेची चांगलीच चर्चा होती. गेल्या पाच वर्षांच्या काळात नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. मात्र, या पत्रकार परिषदेतील संवाद हा एकतर्फीच राहिला. अमित शहा आणि नरेंद्र मोदी या दोघांनी पक्षाची भूमिका सविस्तरपणे मांडली. मात्र, पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीच उत्तरे दिली. मोदींनी प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही, असे शहांनी यावेळी सांगितले.