प्रियंका गांधी तेलंगणामधून निवडणूक रिंगणात उतरु शकतात !

Priyanka Gandhi Vadra Telangana Visit : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा तेलंगाणामधून लढण्याची शक्यता आहे. लोकसभा 2024 साठी काँग्रेसची रणनिती ठरवत आहे. दरम्यान, प्रियंका गांधी 8 मे रोजी तेलंगणामध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.  

सुरेंद्र गांगण | Updated: May 7, 2023, 01:29 PM IST
प्रियंका गांधी तेलंगणामधून निवडणूक रिंगणात उतरु शकतात ! title=
Priyanka Gandhi Vadra to visit Telangana ( Pic courtesy - PTI )

Priyanka Gandhi Vadra Telangana Visit : काँग्रेस नेत्या आणि महासचिव प्रियंका गांधी वाड्रा तेलंगाणामधून लढण्याची शक्यता आहे. लोकसभा 2024 साठी काँग्रेस रणनिती ठरवत आहे. यानुसार प्रियंका गांधी यांना तेलंगणातून निवडणुकीत उभं करण्यावर काँग्रेस गांभीर्याने विचार करत आहे. प्रियंका गांधी मेदक किंवा मेहबूबनगरमधून निवडणूक लढवू शकतात, तशी शक्यता आहे.1980 मध्ये इंदिरा गांधींनीही मेदक मतदारसंघातूनच निवडणूक लढवली होती. तेव्हा प्रियंका गांधीही इंदिरा गांधी यांच्या पावलावर पाऊल टाकणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. दरम्यान, प्रियंका गांधी 8 मे रोजी तेलंगणामध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्याचवेळी प्रियंका सोमवारी संध्याकाळी येथील सरुर नगर स्टेडियमवर होणाऱ्या 'युवा संघर्ष सभेत' 'हैदराबाद युवा घोषणापत्र' जारी करतील, असे पक्षाने म्हटले आहे. 

सरचिटणीस म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्या राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. तेलंगणातील बेरोजगारीचा मुद्दा त्या या सभेत उपस्थित करण्याची शक्यता आहे. उद्या सोमवारी राज्यातील पहिली रॅली होत आहे. तर वारंगलमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जाहीर केलेल्या शेतकरी घोषणेच्या धर्तीवर युवकांसाठी घोषणा अपेक्षित आहे. 'युवा घोषणे'मध्ये तरुणांना आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती, बेरोजगारी दूर करण्याबाबत पक्षाला ठोस आश्वासने द्यावी लागतील, अशी चर्चा आहे.

प्रियंका यांना मेदक किंवा महबूबनगर येथून निवडणूक उमेदवारी देण्याच्या विचारात काँग्रेस गांभीर्याने विचार केल्याचे समजते. जर पक्षाने त्यांना उमेदवारी निश्चित केली, तर प्रियंका तेलंगणामधून निवडणुकीत पदार्पण करणार आहेत. 

भारत राष्ट्र समितीचे ( BRS) सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी 2009 मध्ये महबूबनगरमधून निवडणूक लढवली होती. केसीआर यांनी 2014 मध्ये मेदक लोकसभा मतदारसंघ आणि गजवेल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि दोन्ही जिंकले. त्यानंतर, त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिला ज्यानंतर त्याचवर्षी पोटनिवडणुकीत भारत राष्ट्र समितीचे नेते के प्रभाकर रेड्डी मेदकमधून निवडून आले आणि नंतर 2019 च्या निवडणुकीतही ते विजयी झालेत.

मेदक जिल्हा देखील KCR चा मूळ रहिवासी आहे आणि BRS च्या बुरुजांपैकी एक मानला जातो. पक्षाने 2014 मध्ये मेदक लोकसभा मतदारसंघातील सर्व सात विधानसभा मतदारसंघ जिंकले. 2018 मध्येही सहा जागा जिंकल्या. ही परिस्थिती पाहता, प्रियंका गांधी येथून निवडणूक लढवतील की नाही, याबाबत शंका आहे.

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काही महिने अगोदर तेलंगणात या वर्षाच्या शेवटी निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम सार्वत्रिक निवडणुकांवर होणार असल्याचे काँग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, काँग्रेसने तेलंगणा जिंकले तर प्रियंका यांच्यासाठी ते सोपे होऊ शकते.  प्रियंका तेलंगणामधून निवडणुकीत पदार्पण करणार असल्याची घोषणा झाल्यास मतदारांचा मूड काँग्रेसच्या बाजूने बदलू शकतो. ते विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला गती मिळण्यास मदत होईल, अशी राजकीय चर्चा आहे.