मुंबई : राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची एकत्र बैठक बोलावली होती. ज्यामध्ये अनेक पक्षाचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीत भाजपच्या विरोधात राष्ट्रपतीपदाचा उमेदवार देण्याचे नक्की झाले तसेच काही नावे देखील सूचवण्यात आली. सर्वात आधी नाव शरद पवार यांचं सूचवण्यात आलं. पण खुद्द शरद पवारांनी याला नकार दिल्याने दुसऱ्या नावांची चर्चा सुरु झाली.
दुसऱ्या नावांपैकी नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांचं नाव देखील चर्चेत होतं. पण त्यांनी संयुक्त विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून विचार करण्यासाठी आपले नाव मागे घेतले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यांच्या उमेदवारीला काही विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता फारुख अब्दुला यांनी ही नकार दिल्यानंतर नव्या नावाची चर्चा सुरु झालीये.
फारुख अब्दुल्ला म्हणाले की, 'राष्ट्रपतीपदासाठी संभाव्य संयुक्त विरोधी उमेदवार म्हणून मी माझे नाव मागे घेत आहे. मला विश्वास आहे की, जम्मू-काश्मीर एका वेगळ्या वळणावरून जात आहे. अशा अनिश्चित काळात राज्यातील जनतेला बोलता यावे यासाठी माझे प्रयत्न आवश्यक आहेत.'
राष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून अजून कोणत्याही उमेदवाराची घोषणा झालेली नाही. याबाबत पक्षाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे.
देशाच्या नव्या राष्ट्रपतीबाबत देशवासियांमध्य़े देखील उत्सूकता आहे. त्यामुळे मोदी कोणाचं नाव सूचवतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.