बंगळुरू: कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यावर जेडीएसचे नेते एच डी कुमारस्वामी खऱ्या अर्थाने किंगमेकर झालेत. काँग्रेसने कालच कुमारस्वामींना पाठिंबा दिला आहे. दोघांनी मिळून सत्तेस्थापनेचा दावाही सादर केलाय. असं असलं तरी, आता सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपनं कुमारस्वामींना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय. आज सकाळी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे कर्नाटक प्रभारी प्रकाश जावडेकर कुमारस्वामींना भेटल्याची बंगळूरूत चर्चा आहे. जावडेकर कुमारस्वामी राहत असलेल्या हॉटेलमधून बाहेर पडले. त्यामुळे भाजपनं जेडीएसला सत्तेत सहकारी बनवण्याचा प्रस्ताव ठेवल्याचं बोललं जातंय. थोड्याच वेळात भाजपच्या आमदारांची बैठक सुरू होतेय. त्यात येडीयुरप्पांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली जाणार आहे. त्यानंतर येडीयुरप्पा पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचा दावा सादर करण्यासाठी राज्यपालांना भेटणार असल्याचीही माहिती आहे. आमदारांच्या बैठकीआधी भाजपच सत्ता स्थापन करेल असा दावा जावडेकरांनी केलाय.
कर्नाटकात जेडीएसनं सत्ता स्थापनेचा दावा केल्यावर आता आमदारांना एकत्र ठेवण्याचं मोठं आव्हान कुमारस्वामींसमोर आहे. जेडीएसचे दोन आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं पुढे आल्यावर कुमारस्वामींनी सर्व आमदारांना घरी बोलावून घेतलं आहे. भाजपच्या संपर्कातल्या आमदारांनाही योग्य तो सन्मान राखला जाईल असं आश्वासन कुमारस्वामींनी दिलंय. आतापर्यंत २८ आमदार कुमारस्वामींच्या उर्वरित आमदार ९ वाजेपर्यंत पोहचतील असा अंदाज आहे. कुमारस्वामींच्या घरीच जेडीएसच्या आमदारांची बैठक होणार आहे.