NDA साठी मोदी, INDIA तून कोण? विरोधकांमध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत सप्सेन्स

NDA vs INDIA : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातल्या एडीएला उत्तर देण्यासाठी 26 पक्षांच्या विरोधी पक्षांनी आघाडी केली. पण पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांच्यासमोर कोण उमेदवार देणार याबाबत अजूनही सप्सेन्स आहे.

राजीव कासले | Updated: Jul 19, 2023, 09:28 PM IST
NDA साठी मोदी, INDIA तून कोण? विरोधकांमध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत सप्सेन्स title=

NDA vs INDIA : 2024 लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तयारीला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या (BJP) नेतृत्वाखाली एनडीए (NDA) विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी एकत्र आली आहे. तर एनडीएला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी INDIA नावाने आघाडी केली आहे. I.N.D.I.A. म्हणजे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लूसिव अलायंस. एनडीएत 38 पक्ष आहेत. तर I.N.D.I.A.त  26 पक्षांची एकजूट झालीय. पण प्रश्न आहे तो I.N.D.I.A.चं नेतृत्व कोण करणार? लोकसभा निवडणूक 2024 तही पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचाच चेहरा असणार हे निश्चित आहे. पण विरोधी पक्षांतून पतंप्रधानपदाचा उमेदवार अद्याप देण्यात आलेला नाही.

बंगळुरुत पार पडलेल्या दोन दिवसांच्या बैठकीत याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. विरोधी पक्षाचा चेहरा कोण असणार? आघाडीचं नेतृत्व कोण करणार? यावर उत्तर देताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ऑर्डिनेशन कमिटी स्थापन केली जाईल, ज्यात 11 सदस्य असतील असं उत्तर दिलं. ही समिती सर्व पक्षांमध्ये समन्वय स्थापित करण्याचं कम करेल. खर्गे यांच्या उत्तरावरुन नरेंद्र मोदी यांच्या समोर एक उमेदवार न देता सामुहिक नेतृत्वाच्या फॉर्म्युलावर काम केलं जाईल हे स्पष्ट होतं. 

मोदी एनडीएचा चेहरा
1996 लोकसभा पासून भाजप पंतप्रधानपदाचा एक चेहरा देऊन निवडणूक लढवत आली आहे. 1996 ते 2004 दरम्यान अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. 2009 मध्य एनडीने लालकृष्ण अडवाणी यांच्यावर विश्वास दाखवला. पण 2009 मध्ये यूपीएने सत्तेत पूनरागमन केलं आणि मनमोहन सिंग पंतप्रधान बनले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भाजपने पंतप्रधानपदाचा उमेदमवार म्हणून जाहीर केलं. तर मनमोहन सिंग हे यूपीएचा चेहरा होते. या निवडणुकीत एनडीए मोठ्या फरकाने विजयी झाली. 

2019 मध्येही भाजपने हीच परंपरा कायम राखली. पंतप्रधान नरेंद्र नोदी यांच्याच नेतृत्वाखाली एनडीए निवडणुकीच्या रिंगणात उतरली. याऊलट 2019 यूपीएने पंतप्रधानपदाचा चेहराच दिला नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली यूपीएने प्रचार केला. 

2024 लोकसभा निवडणूक
आता 2024 लोकसभा निवडणुकीत एनडीए विरुद्ध इंडिया अशी लढत रंगणार आहे.  I.N.D.I.A.ने सामुहिक नेतृत्वाचा फॉर्म्युला ठेवला आहे. हा फॉर्म्युला मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत यशस्वी ठरला आहे. याशिवाय माहागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवर विरोधक जोर देतील. 2019 मध्ये राहुल गांधी यांनी राफेलचा मुद्दा उचलून धरला होता. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. पण नुकत्याच झालेल्या कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने कोणत्याही एका नेत्याला टार्गेट न करतात मुद्यांवर जोर दिला होता. याचा परिणाम पाहिला मिळाला. कर्नाटकात काँग्रेस एकहाती सत्तेत आली. आता लोकसभा निवडणूक 2024 साठीही  I.N.D.I.A. दोन चेहऱ्यांदरम्यान लढाई न लढता मुद्यांची लढाई लढताना दिसेल.