पीएनबी घोटाळा : मेहुल चोकसीनं सोडलं भारतीय नागरिकत्व

'क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय मुंबईनं माझा पासपोर्ट का रद्द करण्यात आला याबद्दल मला कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही'

Updated: Jan 21, 2019, 10:36 AM IST
पीएनबी घोटाळा : मेहुल चोकसीनं सोडलं भारतीय नागरिकत्व title=

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेचा (पीएनबी) साडे तेरा हजार करोड रुपयांचा घोटाळा उजेडात आल्यानंतर भारतातून फरार झालेला व्यावसायिक मेहुल चोकसीनं भारताचं नागरिकत्व सोडलंय. याचसोबत मेहुल चोकसीच्या भारत प्रत्यपर्णाच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना जोरदार झटका बसलाय. मेहुल चोकसीनं एन्टींगा हायकमीशनमध्ये भारतीय पासपोर्ट जमा केलाय. नागरिकता सोडण्यासाठी १७७ यूएस डॉलरचा ड्राफ्टही जमा केलाय. त्यामुळे, आता मोदी सरकार मेहुल चोकसीला कसं भारतात परत आणणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 

परदेश मंत्रालयाचे संयुक्त सचीव अमित नारंग यांनी गृहमंत्रालयाला याबद्दल सूचना दिलीय. नागरिकता सोडणाऱ्या फॉर्ममध्ये चोकसीनं आपला नवा पत्ता जॉली हार्बर सेंट मार्कस एन्टीगा असा लिहिलाय. हायकमीशनच्या म्हणण्यानुसार, चोकसीनं नियमांनुसार भारताचं नागरिकत्व सोडून एन्टीगाचं  नागरिकत्व घेतलंय. 

मेहुल चोकसी भारतीय नागरिकत्व सोडून प्रत्यपर्णाच्या कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न करतोय. चोकसीची याबाबत एन्टीगा कोर्टात २२ फेब्रुवारी रोजी सुनावणी आहे. पंतप्रधान कार्यालयानं परदेश मंत्रालय आणि चौकशी समित्यांकडून अहवाल मागवलेत. उल्लेखनीय म्हणजे, पीएनबी घोटाळ्यातील दुसरा महत्त्वाचा आरोपी नीरव मोदीनं लंडनमध्ये आसरा घेतलाय. 

पंजाब नॅशनल बँकेच्या करोडो रुपयांचा घोटाळा करून गीतांजली समूहाचा प्रमोटर मेहुल चोकसीनं आरोग्याच्या कारणांमुळे तसंच पासपोर्ट रद्द झाल्यानं भारतात परतणं 'अशक्य' असल्याचं म्हटलंय. चोकसीला सीबीआयसमोर ७ मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यावर त्यानं आपण कामानिमित्तानं परदेश वारीवर असल्याचं सांगितलं होतं. 

चोकसीनं आपल्या सात पानी पत्रात म्हटलंय, 'भारतात परतणं माझ्यासाठी अशक्य आहे. क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय मुंबईनं माझा पासपोर्ट का रद्द करण्यात आला याबद्दल मला कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. तसंच मी भारताच्या सुरक्षेसाठी कसा धोकादायक आहे हेदेखील सांगितलेलं नाही'.

'मी माझ्या आरोग्यासाठी चिंतेत आहे कारण भारतात मला अटक करण्यात येण्याची भीती आहे. तसंच मला हव्या त्या रुग्णालयात उपचार करण्याची परवनगी मिळणार नाही. आरोग्यासंबंधी सुविधा मला तिथं मिळू शकणार नाहीत. केवळ सरकारी रुग्णालयांत उपचार केले जातील. तुरुंगात बंद असणाऱ्या कोणत्याही आरोपीला त्याच्या आवडीचा डॉक्टर मिळत नाही' असंही त्यानं आपल्या पत्रात म्हटलंय. 

'भारतातील संपत्ती आणि बँक खाते जप्त केल्यामुळे तसंच भारतातील सर्व कार्यालयांना टाळं ठोकल्यानं आपल्या व्यापारावर वाईट परिणाम झाल्याचाही' चोकसीनं यात उल्लेख केलाय.