नवी दिल्ली : हिंदू-मुस्लीम असा भेद केला का? त्यांना हिंदू राष्ट्र बनवायचं होतं का? असे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत उपस्थित केले. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा उल्लेख करत काँग्रेसवर निशाणा साधला.
पाकिस्तानची स्थिती पाहता गांधींजींसह नेहरुंच्याही भावना जोडल्या होत्या. अनेक दशकांनंतरही पाकिस्तानचे विचार बदलले नाहीत, आजही तेथे अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारत-पाकिस्तानात राहणाऱ्या अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी १९५० मध्ये नेहरु-लियाकत करार झाला. या करारामध्ये धार्मिक अल्पसंख्यांकांचा उल्लेख असल्याचेही ते म्हणाले.
५ नोव्हेंबर १९५० रोजी या संसदेत नेहरुंनी सांगितलं होतं की, जे लोक भारतात स्थायिक होण्यासाठी आले आहेत, त्यांना नागरिकत्व मिळण्याचा हक्क आहे आणि यासाठी कायदा अनुकूल नसल्यास, कायद्यात बदल केले गेले पाहिजेत, असं मोदींनी भाषणादरम्यान सांगितलं.
काँग्रेसकडून केवळ बोललं जातं, खोटी आश्वासनं दिली जातात आणि दशकांपासून ती आश्वासनं टाळली जात असल्याची टीका पंतप्रधान मोदींनी यावेळी केली.
भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीला 'ड्रामा' संबोधल्यानंतर विरोधकांनी गदारोळ करत 'महात्मा गांधी अमर रहे' अशा घोषणा दिल्या.
पंतप्रधान मोदींनी यावर आणखी काही? असा उपाहासात्मक प्रश्न केला. मोदींच्या या प्रश्नावर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी हा तर केवळ ट्रेलर आहे असं उत्तर दिलं. त्यांच्या उत्तरावर मोदींनी तुमच्यासाठी गांधी ट्रेलर असू शकतात...आमच्यासाठी गांधी जिंदगी आहे, असं मोदी म्हणाले.