मुंबई : आता नागरिकांसाठी पॅन कार्ड (Pan Card) बनवण्याचं काम अगदी सोपं झालंय. केंद्र सरकार याच महिन्यात ताबडतोब पॅन कार्ड बनवून देण्याची सुविधा तुम्हाला देणार आहे. यासाठी महसूल विभागानं (Revenue Department) सगळ्या तयाऱ्याही पूर्ण केल्यात. यासाठी तुम्हाला केवळ तुमची माहिती सरकारसोबत शेअर करावी लागेल. त्यानंतर ताबडतोब तुम्ही आपलं ई-पॅन कार्ड (e-Pan Card) मिळवू शकाल.
महसूल विभागानं दिलेल्या माहितीनुसार, ई-पॅन कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर वेबसाईटवर सर्वात खालच्या बाजूला Apply e-PAN वर जाऊन क्लिक करा. या सेक्शनमध्ये जाऊन अर्जदाराला आपली माहिती आणि आधारकार्ड (Aadhaar Card) माहिती शेअर करावी लागले.
त्यानंतर आधारकार्डाला जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी (OTP) धाडण्यात येईल. या ओटीपीच्या मदतीनं तुम्हाला ई-पॅन कार्ड तयार करता येईल. हे पॅन कार्ड तुम्हाला तुमच्या ई-मेलवर मिळेल. तिथून तुम्ही हे ई-पॅन डाऊनलोड करून त्याचा वापर करू शकाल.
महसूल विभागाचे सचिव अजय भूषण पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पात ताबडतोब पॅन कार्ड जारी करण्याचा उल्लेख केला होता. आयकर विभागानं ही योजना लागू करण्यासाठीच्या सगळ्या तयारी केलीय. ही योजना याच महिन्यात सुरू होईल, असं पांडे यांनी म्हटलंय. आयकर विभाग NSDL आणि UTI-ITSL या दोन एजन्सीद्वारे पॅन कार्ड जारी करतं.
उल्लेखनीय म्हणजे, केंद्र सरकारनं आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक करण्याची योजना बनवलीय. यासाठी तुम्हाला आता वेगळा ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची गरज राहणार नाही. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पॅन कार्डशी संबंधित गुन्हे रोखण्यासाठी याचा फायदा होणार आहे. तसंच आयकर कायद्यानुसार, कोणत्याही व्यक्तीला आयकर परतावा दाखल करताना आपल्या आधार क्रमांकाचा उल्लेख करणं गरजेचं आहे. ३१ मार्च २००२ पर्यंत पॅन आणि आधार लिंक करणं गरजेचं आहे.