प्रत्येकाची 'बारी' येत आहे, मोदींचा काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा

प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं तीन वेळा चौकशी केली आहे.

Updated: Feb 10, 2019, 11:24 PM IST
प्रत्येकाची 'बारी' येत आहे, मोदींचा काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा title=

हुबळी : प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं तीन वेळा चौकशी केली आहे. ६ आणि ७ फेब्रुवारीनंतर आता तिसऱ्यांदा वाड्रांची चौकशी झाली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. 'ज्यांच्या कमाईबद्दल बोलायलाही लोकं घाबरत होती, आज त्यांना कोर्टात यंत्रणांच्या प्रश्नांसाठी हजेरी लावावी लागत आहे. त्यांना देश-परदेशातल्या बेनामी संपत्तीचा हिशोब द्यावा लागतोय. ज्यांनी कोणी दलाली केली आहे, एक एक करून त्यांची बारी येत आहे', असं मोदी म्हणाले.

कर्नाटकमधल्या कुमारस्वामी यांच्या अस्थिर सरकारवरही मोदींनी टीका केली. 'प्रत्येक दिवशी मुख्यमंत्र्यांना धमी मिळत आहे. त्यांची पूर्ण उर्जा दिवस-रात्र काँग्रेसच्या बड्या नेत्यांपासून खूर्ची वाचवण्यात जात आहे. ते सार्वजनिक ठिकाणी स्वत:च्या मजबुरीचं रडगाणं गात आहेत', असं वक्तव्य मोदींनी केलं.

विरोधकांच्या शेतकरी कर्जमाफीवरही त्यांनी मोदींनी निशाणा साधला. 'गेल्या कित्येक दशकांपासून ते हाच खेळ खेळत आहेत. शेतकरी कर्जमाफीच्या १० वर्षांच्या प्लान ते समोर आणत आहेत. पण १०० पैकी फक्त २५-३० शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत आहे. ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होतंय, त्यांनाही तुटपुंजी मदत मिळते आणि उरलेली रक्कम मध्यस्ताच्या खिशात जाते,' असा आरोप मोदींनी केला आहे. 'इतिहासात पहिल्यांदाच वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपये असणाऱ्यांना करमाफी देण्यात आली आहे,' असं सांगत मोदींनी त्यांच्या कामाचा पाढा वाचला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्नाटकमधल्या हुबळीमध्ये आले होते. याठिकाणी त्यांनी आयआयटी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (आयआयआयटी) धारवाडचं भूमिपूजन केलं. याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मोदींनी २,३५० घरांसाठी ई-गृह प्रवेशही दिला.