Narendra Modi swearing in ceremony Update: केंद्रात एनडीएचं (NDA) सरकार सलग तिसऱ्यांदा शपथ घेण्याची तयारी करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi oath ceremony) आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार यासंबंधी अनेक मोठ्य़ा घडामोडी समोर येत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, केरळ आणि तामिळनाडूमध्ये भाजपासाठी कठोर परिश्रम करणाऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाऊ शकते. तामिळनाडू राज्य भाजपा अध्यक्ष अन्नामलाई कुप्पुस्वामी (के. अन्नामलाई) यांनाही नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. तसंच केरळमध्ये पहिल्यांदा कमळ फुलवणारे सुरेश गोपीही मोदी सरकारचा एक भाग असणार आहेत. दिल्लीतून फक्त हर्ष मल्होत्रा मंत्री होणार आहेत. आसाममधून सर्बानंद सोनेवाल यांनाच स्थान मिळत आहे. पंजाबमधील लुधियानामधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक हरलेले रवनीत सिंह बिट्टू यांनाही मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
मोदी कॅबिनेटच्या पूर्ण यादीबद्दल बोलायचं गेल्यास त्यात राजनाथ सिंह (Rajnath Singh), शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan), नितीन गडकरी (Nitin Gadkari), हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि करनालमधून खासदार असणारे मनोहरलाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांच्याही नावाचा समावेश आहे. याआधी जेडीयू (JDU) नेते आणि राज्यसभा खासदार रामनाथ ठाकूर (Ram Nath Thakur) यांनी झी न्यूज़शी (Zee News) संवाद साधताना निमंत्रण पत्रिका दाखवली होती.
तसंच अपना दलच्या (एस) नेत्या अनुप्रिया पटेल (Anupriya Patel), लोजपाचे (राम विलास) अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्यासह जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi), रालोदचे प्रमुख जयंत चौधरी (Jayant Chaudhary) आणि टीडीपी खासदार राम नायडू (Ram Naidu) यांनाही फोन आला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, शांतनू ठाकुर (Shantanu Thakur) यांनाही फोन आला होता. शांतनू हे पश्चिम बंगालमधील बनगावमधून भाजपाचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. गुरुग्रामचे राज्यसभा खासदार राव इंद्रजित सिंह यांनाही फोन आला आहे. रामदास आठवले यांनादेखील फोन आला आहे. जितेंद्र सिंह यांचाही मोदी मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना मंत्री करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
ज्योतिरादित्य शिंदे होणार मंत्री
मध्य प्रदेशात भाजपाने अप्रतिम कामगिरी केली आहे. 29 पैकी 29 खासदार भाजपाच्या खात्यात आहेत. अशा परिस्थितीत शिवराज सिंह चौहान यांच्यासह ज्योतिरादित्य शिंदे यांनाही (Jyotiraditya Scindia) फोन आला आहे. तसंच जेडीएस कोट्यातील कुमारस्वामी (K Kumaraswamy) देखील मंत्री होणार आहेत. तसंच पियुष गोयल यांनाही बोलावण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी वैष्णव यांनाही मंत्री करण्यात येणार आहे. मोदी 2.0 मध्ये आरोग्य मंत्री असलेले मनसुख मांडविया यांनाही मोदी मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी फोन आला आहे.
महाराष्ट्रातून 6 खासदार केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार आहेत. यामध्ये नितीन गडकरी (नागपूर), पियूष गोयल (मुंबई), रक्षा खडसे (रावेर), मुरलीधर मोहोळ (पुणे), प्रतापराव जाधव (बुलढाणा, शिवसेना), रामदास आठवले (आरपीआय) यांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे भाजपाच्या मोठ्या दलित चेहऱ्यांपैकी एक अर्जुन राम मेघवाल यांना मंत्री करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मेघवाल सलग तिसऱ्यांदा मोदी मंत्रिमंडळात सामील होणार आहेत. डॉ.आंबेडकरांनंतर मेघवाल हे पहिले कायदा मंत्री झाले. मोदी २.० मध्ये ते कायदा राज्यमंत्री होते. पहिल्या दोन सरकारांमध्ये त्यांना संसदीय कामकाजाची जबाबदारी देण्यात आली होती.
शपथविधीआधी नरेंद्र मोदींनी सर्व भावी मंत्र्यांची भेट घेत संदेश दिला आहे. 'चाय पे चर्चा'मध्ये नरेंद्र मोदींनी सरकारचा अजेंडा समजावून सांगितला आहे. मंत्रालय सांभाळताच सर्वांना कामाला लागायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. यासोबतच नरेंद्र मोदींनी भविष्यातील सर्व मंत्र्यांना 100 दिवसांच्या कृती योजनेची कल्पना दिली आहे, जी त्यांना अंमलात आणावी लागेल. यामध्ये प्रलंबित योजना पूर्ण करण्याबरोबरच ज्याला जे खाते मिळेल त्याला योग्य रुप द्यावं लागेल. जेणेकरुन लोकांची एनडीएवरील विश्वास अधिक दृध होईल.