महिला आरक्षण विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत संमत झालं आहे. विधेयक संमत झाल्यानंतर दिल्लीमधील भाजपा कार्यालयात आनंद साजरा करण्यात आला. या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले होते. येथे भाजपाच्या महिला कार्यकर्त्या आणि नेत्यांनी फुलांचा वर्षाव करत नरेंद्र मोदींचं स्वागत केलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी भाजपाध्यक्ष जे पी नड्डादेखील हजर होते.
दरम्यान नरेंद्र मोदी भाजपा कार्यालयात दाखल झाले असता एक महिला त्यांच्या पाया पडायला पुढे आली होती. यावेळी नरेंद्र मोदी यांनी तिला रोखलं. महिलांच्या सन्मानार्थ हे विधेयक मंजूर केलं असल्याने नरेंद्र मोदींनी महिलेला थांबवलं. मात्र यानंतर मंचावर महिलांनी गळ्यात हार घालत सत्कार केला असता नरेंद्र मोदींनी खाली वाकून सर्वांना नमस्कार करत आदर व्यक्त केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
नरेंद्र मोदींनी यावेळी भाषण करताना विरोधकांवर जोरदार टीका केली. याआधी संसदेत हे विधेयक आणण्यात आलं होतं. पण त्यावेळी फक्त चर्चा झाली. कठोर प्रयत्न करण्यात आले नाहीत. कारण हे विधेयक मंजूर करण्याची इच्छाच नव्हती. सर्वांनी मत तर दिलं होतं. पण काही लोकांचा नारी शक्ती वंदन शब्दांवर आक्षेप होता. आपण काय महिला, आई, बहिणीला वंदन करत नाही का? अशी विचारणा नरेंद्र मोदींनी केली.
"देशाने नवा इतिहास घडताना पाहिलं आहे. आम्हाला हा इतिहास घडवण्याची संधी दिली हे आमचं सौभाग्य आहे. येणाऱ्या अनेक पिढ्या याची चर्चा करतील. महिला आरक्षण विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुमताने मंजूर झालं. लोकसभेत तर सर्वसंमतीने मंजूर झाल्याबद्दल मी अभिनंदन करतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, अन्य वरिष्ठ सहकारी आणि देशातील माता भगिनींना मी येथून नमस्कार करतो," असं मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की, काही निर्णयांमध्ये देशाचं नशीब बदलण्याची क्षमता असते. आता आपण अशाच एका निर्णयाचे साक्षीदार झालो आहोत. रेकॉर्डब्रेक मतांनी विधेयक मंजूर झालं आहे. ज्यासाठी देश इतक्या दशकांपासून वाट पाहत होता, ते स्वप्न मंजूर झालं आहे. ही देशासाठी फार खास वेळ आहे. तसंच भाजपा कार्यकर्त्यांसाठी खास वेळ आहे. प्रत्येक महिलेचा आत्मविश्वास गगनाला भिडत आहे.
केंद्र सरकारने 18 सप्टेंबरला 5 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावलं होतं. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नव्या संसदेत कामकाजाला सुरुवात झाली. यानंतर मोदी सरकारने मंगळवारी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक सादर केलं. लोकसभेत 454 खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केलं. एमआयएमच्या दोन खासदारांनी विरोधात मतदान केलं.
यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यसभेत केंद्र सरकारने विधेयक सादर केलं. रात्री उशिरापर्यंत संसदेचं कामकाज सुरु होतं. येथे सर्वसमंतीने 214 मतांनी विधेयक मंजूर झालं. आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलं जाणार असून, त्यांच्या स्वाक्षऱीनंतर कायद्यात रुपांतर होईल.