मोदींना दिलेल्या 'त्या' पुरस्कारावरून राहुल गांधी आणि स्मृती इराणींमध्ये जुंपली

जगप्रसिद्ध पुरस्कार मिळाल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करतो.

Updated: Jan 15, 2019, 06:24 PM IST
मोदींना दिलेल्या 'त्या' पुरस्कारावरून राहुल गांधी आणि स्मृती इराणींमध्ये जुंपली title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच फिलिप कोटलर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मात्र, या पुरस्कारावरून राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगताना पाहायला मिळाले. राहुल गांधी यांनी या पुरस्काराची खिल्ली उडवताना म्हटले होते की, कोटलर प्रेसिडेंशियल हा जगप्रसिद्ध पुरस्कार मिळाल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करतो. हा पुरस्कार इतका प्रसिद्ध आहे की, या पुरस्कारासाठी कोणतेही परीक्षक मंडळ नसते. एवढेच काय यापूर्वी तो कधीही दिलाच गेला नव्हता. विशेष म्हणजे अलीगढमधील एका अज्ञात कंपनीकडून हा पुरस्कार देण्यात येतो. पतंजलि आणि रिपब्लिक टीव्ही या उपक्रमाचे भागीदार आहेत, अशी खोचक टिप्पणी राहुल गांधी यांनी केली होती. 

विशेष म्हणजे या सगळ्या वादात लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि राजदचे नेता तेजस्वी यादव यांनीही उडी घेतली. तेजस्वी यादव यांनी अभिनव, अनोखा आणि अद्भुत पुरस्कार मिळाल्याबाद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन, अशी खोचक टिप्पणी ट्विटरवरून केली.

यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले. त्यांनी राहुल गांधी यांना उद्देशून ट्विट करताना म्हटले की, ही गोष्ट अशी व्यक्ती बोलत आहे की, ज्यांच्या कुटुंबाने स्वत:ला भारतरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला होता.

अमेरिकेच्या इमोरी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. जगदीश सेठ यांच्या हस्ते नरेंद्र मोदी यांना फिलिप कोटलर पुरस्कार प्रदान करण्यात आला. फिलिप कोटलर हे प्रसिद्ध मार्केटिंग गुरू आहेत. सध्या अमेरिकेत नॉर्थवेस्टर्न यूनिवर्सिटीच्या केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये ते मार्केटिंगचे प्रोफेसर आहेत. आपल्या आजारपणामुळे त्यांनी डॉक्टर जगदीश सेठ यांना पंतप्रधान मोदी यांना पुरस्कार देण्यासाठी पाठवले होते.