गुप्तचर यंत्रणांकडून पाकिस्तानसंदर्भात महत्त्वाचा इशारा

सतर्क व्हा.... 

Updated: Aug 14, 2019, 10:47 AM IST
गुप्तचर यंत्रणांकडून पाकिस्तानसंदर्भात महत्त्वाचा इशारा title=

मुंबई : भारताचा स्वातंत्र्य दिन अवघ्या काही तासांवर आलेला असतानाच गुप्तर यंत्रणांकडून एक अत्यंत महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात पोलिसांना हा इशारा देण्यात आला असून, त्यांना सतर्क करण्यात आलं आहे. पाकिस्तानातून काही दहशतवादी गुजरातमध्ये असणाऱ्या कच्छ भागातील हद्दीतून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा इशारा देण्यात आला आलं आहे. 

गुप्तचर यंत्रणांच्या या इशाऱ्यानंतर सागरी आणि सीमा सुरक्षा दलांनी सदर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, पाकिस्तानच्या बाजूने कोणत्याही प्रकारची घुसखोरी केली जाणार नाही, यावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. 

पूर्व कच्छ भागाचे पोलीस अधीक्षक परिक्षित राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरातील मासेमार आणि गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय कोणहीती संशयास्पद हालचाल आढळल्यास संरक्षण यंत्रणांना याबाबतीत तातडीने माहिती देण्यात यावी असंही त्यांना सांगण्यात आलं आहे. 

कोणताही अयोग्य प्रकार घडल्यास परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गरजेची सर्व पावलं उचलली जाणार असल्याची माहिती पोलीस यंत्रणांकडून 'एएनआय' या वृत्तसंस्थेला देण्यात आली. 

जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेलं अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर या परिसरात तणावाचं वातावरण पाहाया मिळालं. शिवाय गुप्तचर यंत्रणा आणि सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानकडून सीमेपलीकडे एलओसीनजीक बऱ्याच हालचालीसुद्धा पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानकडून नियंत्रणरेषेनजीक तोफा आणि शस्त्रसाठा तैनात असल्याचंही सांगण्यात आलं आहे. याच धर्तीवर भारतात सर्वत्र सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.