भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात?

रेडिओ पाकिस्ताननं एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केलाय

शुभांगी पालवे | Updated: Feb 28, 2019, 10:15 AM IST
भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात? title=

नवी दिल्ली : बुधवारी सकाळी जम्मू काश्मीरमध्ये भारतीय हवाई सीमेत दाखल झालेल्या तीन पाकिस्तानी विमानांपैंकी एका एफ-१६ विमानाला भारतीय वायुसेनेनं लाम सेक्टरमध्ये पाडलं. तर पाकिस्ताननं केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी भारतीय वायुसेनेच्या दोन विमानांना लक्ष्य केलं. तसंच एक भारतीय वैमानिकही जिवंत हाती लागल्याचा दावा पाकिस्तान सैन्यदलाचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केला. काही वेळेपूर्वी एयर व्हाईस आरजीके कपूर आणि परदेश मंत्रालय के प्रवक्ते रवीश कुमार मीडियासमोर आले आणि त्यांनी पाकिस्तानचे खोट्या दाव्यांवर स्पष्टीकरण दिलं. सोबतच एक भारतीय वैमानिक बेपत्ता असल्याचंही स्पष्ट केलं.

पाकिस्ताननं भारतीय सैन्य ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला भारतानं सडेतोड प्रत्यूत्तर दिल्याचं एअर व्हाईस कपूर आणि परदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. परंतु, या दरम्यान भारतीय वायुसेनेचं एक मिग २१ विमान आणि वैमानिक बेपत्ता असल्याचंही त्यांनी सांगितलंय. हा वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात असल्याच्या दाव्याची सत्यता आम्ही पडताळून पाहत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान अद्याप बेपत्ता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विंग कमांडर अभिनंदन यांनी बुधवारी सकाळी मिग २१ या विमानानं उड्डाण घेतलं होतं... ते अद्याप परतलेले नाहीत.  

मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी वायुदलाच्या अधिकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेतली. बेपत्ता भारतीय वैमानिकाला पकडल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय. हा दावा खरा असेल तर संयुक्त राष्ट्रांमार्फत त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं परराष्ट्र मंत्रालयातल्या सूत्रांनी सांगितलंय. काल बालाकोटमध्ये वायुदलानं केलेल्या कारवाईला उत्तर म्हणून आज सकाळी पाकिस्तानी वायुदलानं भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सावध असेलल्या भारतीय वायुदलाच्या ६ मिग-२१ विमानांनी पाठलाग करून पाकिस्तानचा ताफा पळवून लावला. 

पाकिस्ताननं सोशल मीडियावर जाहीर केला व्हिडिओ

दरम्यान, पाकिस्ताननं आपल्या अधिकृत सरकारी वेबसाईटवरून एक व्हिडिओही शेअर केला. परंतु, काही वेळातच हा व्हिडिओ काढण्यात आला. मात्र, हा व्हिडिओ 'रेडिओ पाकिस्तान'च्या सोशल मीडिया अकाऊंटल अजूनही दिसतोय. या व्हिडिओतील व्यक्ती भारतीय वैमानिक अभिनंदन वर्थमान असल्याचं सांगण्यात येतंय. या व्यक्तीला त्याची ओळख विचारल्यानंतर आपला सर्व्हिस क्रमांक २७९८१ असल्याचं त्यानं सांगितलेलं या व्हिडिओत दिसतंय. आपण भारतीय वैमानिक असून आपला धर्म हिंदू असल्याचंही त्यानं म्हटलंय.  

या व्यक्तीला बांधलेल्या अवस्थेत असून तो हालचाल करू शकत नसून त्याचे डोळेही बांधलेले आहेत. या व्हिडिओत दिसतंय त्यानुसार, मी अधिकाऱ्याशी बोलतोय का? असा प्रश्न या व्यक्तीनं विचारल्यावर त्याला 'होय' असं उत्तर मिळालं. त्यानंतर त्यानं 'मी पाकिस्तान आर्मीसोबत आहे का?' असा प्रश्न विचारला त्यावर त्याला कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही. 

पाकिस्तानच्या नौसेनेच्या एफ १६ जातीच्या विमानांनी हवाई हद्दीचे उल्लंघन करीत बुधवारी सकाळी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. या विमानांनी भारतीय हद्दीत प्रवेश केल्यावर लगेचच भारतीय विमानांनी त्याला प्रत्युत्तर दिले आणि त्यांना परतवून लावले. यावेळी पाकिस्तानचं एक विमान पाडण्यातही भारतीय हवाई दलाला यश आलं. या विमानाच्या वैमानिकाचा पत्ता लागलेला नाही.

दुसरीकडे, भारतीय वायुदलाच्या एका जवानाला अटक केल्याचं पाकिस्तान सैन्यदलाचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी दावा केला. 'सीमारेषा ओलांडणाऱ्या दोन भारतीय विमानांना पाकिस्तान सेनेनं लक्ष्यावर घेतलं. एका भारतीय वैमानिकाला अटक करण्यात आलीय' असं गफूर यांनी बुधवारी सकाळी ट्विट केलं होतं.