३० ऑगस्टला पुन्हा भाजप विरोधक एकवटणार

कर्नाटकनंतर दक्षिण भारतामध्ये पुन्हा एकदा भाजपचे विरोधक एकवटणार आहेत.

Updated: Aug 28, 2018, 10:21 PM IST
३० ऑगस्टला पुन्हा भाजप विरोधक एकवटणार title=

चेन्नई : कर्नाटकनंतर दक्षिण भारतामध्ये पुन्हा एकदा भाजपचे विरोधक एकवटणार आहेत. ३० ऑगस्टला तामिळनाडूमध्ये करुणानिधी यांची श्रद्धांजली सभा होणार आहे. या सभेला १७ पक्षांचे नेते एकत्र येतील अशी माहिती मिळत आहे. श्रद्धांजली सभेला शरद पवार, माजी पंतप्रधान आणि जेडीएस नेते एचडी देवेगौडा, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्याबरोबरच काँग्रेस आणि टीएमसी नेते उपस्थित राहू शकतात.

भाजपकडून अध्यक्ष अमित शाह या सभेला जातील, असं बोललं जात होतं. पण आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय सचिव मुरलीधर राव श्रद्धांजली सभेत भाजपचं प्रतिनिधीत्व करतील, अशी शक्यता आहे. डीएमके पक्षाचा पदभार स्वीकारल्यानंतर स्टालीन यांनी पहिल्याच दिवशी मोदींवर निशाणा साधला. त्यामुळे या सभेला मोदी जातील का नाही हा प्रश्न आहे.

केंद्रातलं मोदी सरकार देशाचं भगवीकरण करत असल्याचा आरोप स्टालीन यांनी केला आहे. पदभार स्वीकारल्यानंतरच्या पहिल्याच सभेत स्टालीन यांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे. त्यामुळे २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत डीएमके-भाजप एकत्र येतील, या शक्यता मावळल्या आहेत. सुरुवातीला डीएमके-भाजप एकत्र येतील, अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या.

करुणानिधी यांच्या निधनानंतर केंद्र सरकारनं राष्ट्रीय दुखवटा घोषित केला होता. तसंच राजकीय सन्मान देऊन करुणानिधींचे अंत्यसंस्कार करण्यात आले. करुणानिधींच्या निधनानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज स्थगित करण्यात आलं होतं. मोदींनीही चेन्नईला जाऊन करुणानिधींना श्रद्धांजली अर्पण केली होती. तर स्टालीन यांनी दिल्लीमध्ये अटल बिहारी वाजपेयींना श्रद्धांजली दिली होती. यामुळे भाजप आणि डीएमकेमध्ये जवळीक वाढते का अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.