विजय माल्ल्याला भारतात परतायचंय, लंडनमध्ये वाटतेय नवी 'भीती'

भारतीय बँकांचं ९ हजार कोटींचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पळालेला विजय माल्ल्या भारतात येण्यासाठी प्रयत्न करतोय.

Updated: Aug 28, 2018, 07:12 PM IST
विजय माल्ल्याला भारतात परतायचंय, लंडनमध्ये वाटतेय नवी 'भीती' title=

लंडन : भारतीय बँकांचं ९ हजार कोटींचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पळालेला विजय माल्ल्या भारतात येण्यासाठी प्रयत्न करतोय. मागच्या २ महिन्यांपासून माल्ल्या तपास यंत्रणांना असे संकेत देत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विजय माल्ल्याची भारतामध्ये मोठी संपत्ती आहे. या संपत्तीवर तपास यंत्रणांनी टाच आणली आहे. या संपत्तीवर पुन्हा एकदा नियंत्रण मिळवण्यासाठी माल्ल्याची भारतात परतण्यासाठी धडपड सुरू आहे. फरार आर्थिक अपराधी विधेयक २०१८ पास झाल्यामुळे भारतातली संपत्ती हातातून जाण्याची भीती माल्ल्याला वाटत आहे. लंडनच्या न्यायालयामध्ये माल्ल्याच्या प्रत्यार्पणाची केस सुरु आहे.

काय आहे फरार आर्थिक अपराधी विधेयक?

फरार आर्थिक अपराधी विधेयक २०१८ नुसार आर्थिक अपराधी घोषित केल्यानंतर त्याच्या संपत्तीवर टाच येते. एकदा संपत्तीवर टाच आल्यानंतर ही जमीन पुन्हा मिळत नाही. त्यामुळे माल्ल्याला त्याची भारतातली संपत्ती गमावण्याची भीती वाटत आहे.

विजय माल्ल्याला आर्थिक फरार अपराधी घोषित करण्यासाठी मुंबईच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरु आहे. याची पुढची सुनावणी ३ सप्टेंबरला सुरु आहे.