omicron update news : देशात ओमायक्रॉनची (Omicron) प्रकरणं वेगाने वाढत आहेत. ओमायक्रॉनने आतापर्यंत 23 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हातपाय पसरला आहे. सध्याच्या प्रकरणांमध्ये ओमायक्रॉन जास्त धोकादायक वाटत नसला तरी तो प्रचंड वेगाने पसरत आहे.
दुसऱ्या लाटेत डेल्टाचा होता धोका
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंटने कहर केला होता. यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार डेल्टा व्हेरिएंटचा सर्वाधिक परिणाम फुफ्फुसांवर होत होता. अशात आता ओमायक्रॉन व्हेरिएंटने पुन्हा एकदा लोकांसमोर प्रश्न उभा राहिलाय. ओमायक्रॉन शरिराच्या कोणत्या भागाला लक्ष्य करतं?
ओमायक्रॉनमुळे शरीराच्या कोणत्या भागाला धोका
आतापर्यंत समोर आलेल्या बहुतांश ओमायक्रोन रुग्णांच्याबाबतीत अतिशय सौम्य स्वरूपाची लक्षणं समोर आली आहेत. अनेक प्रकरणांमध्ये फुफ्फुसांमध्ये पॅचेस दिसले आहेत. पण सध्या कोणतंही मोठे नुकसान झालेलं नाही, ही प्राथमिक आकडेवारी आहे. मोठ्या संख्येने प्रकरणं आली तर आम्हाला आणखी प्रतीक्षा करावी लागेल, सर्व सौम्य स्वरूपाचे आहेत का, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. डेल्टामध्येही असे गंभीर आजार सुरुवातीला दिसले नव्हती. पण नंतर जेव्हा रुग्णांची संख्या वाढली, तेव्हा गंभीर स्वरूपाची प्रकरण अधिक आढळून आली.
ओमायक्रॉन सर्वात जास्त धोका कोणाला?
ओमायक्रॉनच्या आतापर्यंत आढळलेल्या प्रकरणांमध्ये सर्व वयोगटावर (Age Group) याचा परिणाम होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. दक्षिण आफ्रिकेत लहान मुलही ओमायक्रॉनमुळे बाधित होत आहेत. दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत ओमायक्रॉनची जितकी गंभीर प्रकरणं आढळली आहेत, किंवा मृत्यू झाले आहेत, ते लसीकरण न झालेल्या (Unvaccinated) लोकांमध्ये बघायला मिळाली आहेत.
संपूर्ण लसीकरण झालं असेल तरी ओमायक्रॉनची लागण होऊ शकते, पण त्याचा परिणाम जास्त गंभीर नसेल. यामुळे सध्यातरी लसीकरण हे प्रभावी अस्त्र आहे.
ऑक्सिजनचीही गरज आहे का?
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना करावा लागला होता. यावेळी ऑक्सिजन किती महत्त्वाची भूमिका बजावेल, यावर डॉक्टर म्हणतात, सध्यातरी असं फार कमी प्रकरणांमध्ये घडलं आहे. पहिल्या दोन आठवड्यांत ते शून्याच्या बरोबरीचं आहे आणि कोणाचाही मृत्यू झाला नाही.
बहुतेक प्रकरणं सौम्य आहेत आणि त्यांना होमक्वारंटाईन केलं जात आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या लोकांना दोन ते तीन दिवसांनी घरी पाठवलं जात आहे.