कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! पीएफ संदर्भात केंद्राचा मोठा निर्णय

नोकरी गेल्यावर किंवा सोडल्यावर आर्थिक अडचणीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

Updated: Dec 13, 2018, 07:53 PM IST
कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! पीएफ संदर्भात केंद्राचा मोठा निर्णय title=

नवी दिल्ली - कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही कोणतीही नोकरी सोडली किंवा नोकरीवरून तुम्हाला काढण्यात आले. तर एक महिन्यानंतर लगेचच तुम्ही तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खात्यातून ७५ टक्के रक्कम काढू शकणार आहात. केंद्रीय कामगार मंत्रालयाने ६ डिसेंबर रोजी या संदर्भातील शासन निर्णय जारी केला. यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. नोकरी गेल्यावर किंवा सोडल्यावर आर्थिक अडचणीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

यावर्षी जून महिन्यातच केंद्र सरकारने ही घोषणा केली होती. फक्त त्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला नव्हता. तो आता काढण्यात आला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय विश्वस्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता नोकरी सोडल्यावर किंवा गेल्यावर एक महिन्यानंतर तुमच्या पीएफ खात्यामध्ये जेवढी शिल्लक असेल, त्यापैकी ७५ टक्के रक्कम तुम्ही काढू शकणार आहात. ही रक्कम तुम्हाला परत करण्याची गरजही नाही. त्याचबरोबर नोकरी सोडल्यावर किंवा गेल्यावर दोन महिन्यानंतर तुम्ही पीएफ खात्यातील १०० टक्के रक्कम काढू शकणार आहात.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी १९५२ च्या कायद्यात अंशतः रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्यावर किंवा गेल्यावर दोन महिन्यांनंतर १०० टक्के रक्कम काढू शकत होता. आता त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार असून, कर्मचारी अंशतः ७५ टक्के रक्कमही काढू शकणार आहे.