नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणी दोषी असलेल्या अक्षय ठाकूरची पत्नी, पुनिता ठाकूरने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. सरन्यायाधीश रामलाल शर्मा यांच्या कोर्टाने दाखल केलेल्या अर्जात, अक्षय ठाकूरच्या पत्नीने, तिच्या पतीला बलात्कारप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं असून त्याला फाशीची शिक्षा दिली जाण्याचा उल्लेख केला आहे. मात्र, तिने आपला पती निर्दोष असल्याचं सांगत, पतीला फाशी झाल्यानंतर विधवा म्हणून जगायचं नसल्याने तिने पतीसोबत घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.
अक्षय ठाकूरची पत्नी, पुनिता ठाकूरचे वकील मुकेश कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदू विवाह कायद्यांतर्गत काही विशेष प्रकरणांमध्ये पीडित महिलेला तिच्या पतीपासून घटस्फोट घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे. पुनिताचा पती अक्षय ठाकूरला निर्भया बलात्काराप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं असून त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अशात दोषीच्या पत्नीला, पुनिताला अक्षय ठाकूरपासून घटस्फोट घेण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचं, तिच्या वकीलांनी सांगितलं आहे.
या प्रकरणी, कोर्टाने सुनावणीची तारीख १९ मार्च निश्चित केली आहे.
निर्भया हत्याप्रकरणातील ४ दोषींपैकी १ दोषी अक्षय ठाकूर औरंगाबादमधील नबीनगर येथील राहणारा आहे. अक्षय ठाकूरला इतर ३ दोषींसह २० मार्च रोजी फाशी देण्यात येणार आहे.