'अध्यक्ष' शोधार्थ बैठकीतून राहुल-सोनिया निघून गेले, प्रियांका मात्र थांबल्या

बैठकीदरम्यान जगदीश शर्मा आपल्या काही मोजक्या कार्यकर्त्यांसोबत प्रियांका गांधी वाड्रा यांना अध्यक्ष बनवण्याची मागणी करताना दिसले

Updated: Aug 10, 2019, 08:10 PM IST
'अध्यक्ष' शोधार्थ बैठकीतून राहुल-सोनिया निघून गेले, प्रियांका मात्र थांबल्या title=

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्ष पदावरून राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये नवा अध्यक्ष निवडण्यासाठी चर्चा सुरू आहे. यासाठीच काँग्रेस मुख्यालयात शनिवार काँग्रेस कार्य समितीची (CWC) महत्त्वपूर्ण बैठक झाली. पक्षानं एकमुखानं राहुल गांधींना राजीनामा मागे घेण्याची गळ घातल्यानंतरही राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीतून सोनिया गांधी आणि राहुल गांधी बाहेर निघून आले. नवा अध्यक्ष निवडप्रक्रियेत आपण सहभागी राहणार नाही, असं त्यांनी म्हटलंय. मात्र, प्रियांका गांधींनी मात्र या बैठकीसाठी उपस्थित राहिल्या. बैठकीदरम्यान जगदीश शर्मा आपल्या काही मोजक्या कार्यकर्त्यांसोबत प्रियांका गांधी वाड्रा यांना अध्यक्ष बनवण्याची मागणी करताना दिसले. 

राजीनामा देताना नवा काँग्रेस अध्यक्ष काँग्रेस कुटुंबातून नसेल, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. यावर, शर्मा यांनी प्रियांका गांधी यांच्याबद्दल बोलताना वेगळाच तर्क दिला. विवाहानंतर प्रियांका या गांधी परिवाराच्या नाही तर वाड्रा परिवाराच्या सदस्य आहेत. त्यामुळे त्यांना अध्यक्ष बनवायला काहीच हरकत नाही, असं स्पष्टीकरण दिलं. 

सीडब्ल्यूसीच्या बैठकीत राहुल गाधी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रदान मनमोहन सिंह, अहमद पटेल, पी. चिदंबरम, गुलबा नबी आझाद, आनंद शर्मा, ज्योतिरादित्य शिंदे, प्रियांका गांधी वाड्रा, सचिन पायलट, जितीन प्रसाद हे नेते उपस्थित झाले होते. थोड्या वेळानं राहुल गांधी केरळला निघायचं असल्याचं सांगत निघून गेले. 

सीडब्ल्यूसी बैठक पाच वेगवेगळ्या गटांत विभागून पार पडली. विभागवार पाच गट पाडण्यात आले होते. काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार सीडब्ल्यूसी सायंकाळी ८.३० वाजता पुन्हा चर्चा करण्यासाठी उपस्थित होणार आहे. रात्री ९.०० वाजल्याच्या सुमारास काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाचं नाव जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. 

लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. राहुल गांधी यांच्यापूर्वी सोनिया गांधींनी हे पद सांभाळलं होतं.