'वाघ आला तर भाल्याने मारा', सांगणाऱ्या बेअर ग्रिल्सला मोदींनी दिले 'हे' उत्तर

मोदींनी बेअर ग्रिल्सला तरुणपणी हिमालयात असतानाचे अनुभवही सांगितले.

Updated: Aug 10, 2019, 11:20 AM IST
'वाघ आला तर भाल्याने मारा', सांगणाऱ्या बेअर ग्रिल्सला मोदींनी दिले 'हे' उत्तर title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच डिस्कव्हरी चॅनेलवरील 'मॅन व्हर्सेस वाइल्ड' या कार्यक्रमात दिसणार आहेत. येत्या १२ तारखेला हा कार्यक्रम टेलिव्हिजनवर प्रसारित होईल. मात्र, आतापासूनच याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. 

बेअर ग्रिल्सने काही दिवसांपूर्वीच ट्विट करून याबद्दल माहिती दिली होती. यानंतर सोशल मीडियावर या कार्यक्रमातील फोटो आणि क्लीप व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक क्लीप सध्या सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे. 

या क्लीपमध्ये नरेंद्र मोदी आणि बेअर ग्रिल्स अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारताना दिसत आहेत. यावेळी मोदींनी बेअर ग्रिल्सला तरुणपणी हिमालयात असतानाचे अनुभवही सांगितले. तर बेअर ग्रिल्सनेही भारतातील वन्यजीवनाविषयी मोदींना काही अनुभव सांगितले. भारतातील जंगलांमध्ये अनेक धोकादायक प्राणी आहेत. आपण फिरत असलेले अभयारण्यही अशीच धोकादायक जागा आहे. त्यामुळे लोक या अभयारण्यात असताना वाहनातून उतरत नाहीत, असे बेअर ग्रिल्सने मोदींना सांगितले. 

त्यावेळी मोदींनी म्हटले की, आपण निसर्गाविरोधात गेल्यास प्रत्येक गोष्ट धोकादायक असते. मनुष्यही निसर्गाविरोधात गेला तर तोदेखील धोकादायक ठरतो, असे मोदींनी म्हटले. 

यानंतर बेअर ग्रिल्सने मोदींच्या हातामध्ये एक भाला दिला. वाघ आला तर या भाल्याचा उपयोग करा, असे त्याने मोदींना सांगितले. त्यावर मोदींनी म्हटले की, माझे संस्कार मला कोणालाही मारण्याची अनुमती देत नाहीत. केवळ तुम्ही सांगताय म्हणून मी भाला हातात पकडत असल्याचे मोदींनी सांगितले. 

'मॅन व्हर्सेस वाइल्ड'च्या १२ ऑगस्टला प्रसारित होणाऱ्या भागात नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तीमत्त्वाचा नवा पैलू पाहायला मिळेल, असे बेअर ग्रिल्सने सांगितले.