चंदीगढ: खणखणीत आवाज आणि वैशिष्ट्यपूर्ण वकृत्वशैलीसाठी ओळखले जाणारे काँग्रेसचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांना विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच महागात पडला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी सतत भाषणे केल्याने सिद्धू यांची प्रकृती चांगलीच बिघडली. एवढेच नव्हे तर त्यांचा आवाज कायमचा जाण्यापासून थोडक्यात बचावला, असे डॉक्टरांनी सांगितले. पंजाब सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू यांनी तब्बल १७ दिवस विधानसभा निवडणुकीचा तुफान प्रचार केला. या काळात त्यांना तब्बल ७० सभांमध्ये भाषणं केली. त्यामुळे सिद्धू यांच्या स्वरयंत्रावर कमालीचा ताण पडला आणि त्यांची प्रकृती खालावली. यानंतर डॉक्टरांनी सिद्धू यांना आठवडाभर सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार सिद्धू सध्या अज्ञात ठिकाणी विश्रांती घेत आहेत.
काही वर्षांपूर्वी सततच्या विमानप्रवासामुळे सिद्धू यांना डीवीटीची ( डीप वीन थ्रोम्बोसिस) व्याधी जडली होती. त्यामुळे यावेळी सिद्धू यांच्या प्रकृतीला जास्त धोका होता. त्यामुळे सिद्धू यांच्या रक्ताच्या चाचण्याही करण्यात आल्या. यानंतर सिद्धू यांच्यावर प्राणायम व फिजिओथेरपीचे उपचार सुरु आहेत.
गेल्या काही दिवसांपासून नवज्योत सिंग सिद्धू पाकिस्तानविषयी घेतलेल्या भूमिकेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. इम्रान खान यांच्या शपथविधीला पाकिस्तानात जाऊन वाद ओढवून घेतलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी नुकताच कर्तारपूर कॉरिडॉरच्या भूमीपूजनासाठी पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग नाराज झाले होते. मात्र, केंद्रीय नेतृत्वाने आपल्या पाकिस्तान दौऱ्याला हिरवा कंदील दाखवल्याचे सांगत सिद्धू यांनी अमरिंदर सिंग यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष केले होते. यानंतर अमरिंदर सिंग यांच्या समर्थकांनी सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.