नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडणूक नियोजन यामागचं कारण म्हटलं जात आहे.
या निवडणुकीत मिळालेल्या विजयावरुन हे स्पष्ट आहे की 'मोदी लहर' अद्यापही कायम आहे आणि त्यात कुठल्याही प्रकारची कमतरता नाहीये. त्रिपुरात भाजपने शून्यापासून थेट सत्तेपर्यंत मजल मारली आहे.
भारतीय राजकारणाच्या इतिहासात निवडणुकीत यश मिळवण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात यशस्वी ठरले आहेत.
दैनिक भास्करच्या एका रिपोर्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हापासून पंतप्रधान बनले आहेत तेव्हापासून म्हणजेच चार वर्षांत २१ निवडणुका झाल्या आहेत. या पैकी भाजपने १४ राज्यांमध्ये विजय मिळवला. निवडणुकीत अशा प्रकारचं यश मिळवण्याचा रेकॉर्ड इंदिरा गांधी यांच्या नावावर होता.
इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना चार वर्षांत १९ निवडणुका झाल्या होत्या. त्यापैकी १३ राज्यांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला. अशा प्रकारे निवडणुका जिंकण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंदिरा गांधीपेक्षाही सरस ठरल्याचं दिसत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी नागरिकांना दिलेल्या आश्वासनावर त्रिपुरातील नागरिकांनी विश्वास ठेवल्याचं निकालावरुन दिसत आहे.
२०१३ साली पार पडलेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपने खातंही उघडलं नव्हतं. इतकचं नाही तर ५० उमेदवारांपैकी ४९ उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. मात्र, आता भाजपने थेट सत्ता मिळवली आहे.