मुंबई : एखादं गाणं ज्यावेळी आपल्याला भावतं तेव्हा ते एकसारखं गुणगुणत आप,एक प्रकारे ते पाठच करतो. सहसा आवडीची ही गाणी मोकळ्या वेळात, एखाद्या सहलीच्या वेळी, एकांतात किंवा स्नेहसंमेलनात ही गाणी गायली जातात. पण कधी तुम्ही संरक्षम दलाच्या सरावादरम्यान अशी गाणी ऐकली आहेत का?
सहसा संरक्षण दल म्हटलं की काटेकोर शिस्त आणि त्याचं पालन करणारे जवान. सध्या मात्र ही चौकटीबद्ध व्याख्या मोडीत काढत पोलीस अधिकाऱ्यांच्या दलाने सर्वांनाच थक्क केलं आहे.
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चक्क पोलीस दलातील जवान हे हिंदी चित्रपट गीत गाताना दिसत आहेत. बरं, हे गाणंही ते म्हणत आहेत पथ संचलनाच्या सरावादरम्यान. झालात की नाही थक्क?
स्माशिंग ।।smashing routine .. https://t.co/lPQ2ETqjet
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 14, 2019
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये नागालँड पोलीस दलातील काही जवान हे पथ संचलनाच्या सरावादरम्यान त्यांचा अनोखा अंदाज दाखवत आहेत. ज्यामध्ये त्यांना कमांड देणारे पोलीस जवान हे 'ढल गया दिन... हो गई शाम' हे गाणं अनोख्या आणि तितक्याच लक्षवेधी अंदाजात गाताना दिसत आहे. कदमताल आणि परेड करताना या गाण्यासोबत जमलेला अचूक ठेका पाहताना चेहऱ्यावर नकळत स्मितहास्य उमटत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला खुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांनीही दाद दिली आहे. 'स्माशिंग ।।smashing routine' असं लिहित त्यांनी या व्हिडिओला आणि पोलीस पथकाला दाद दिली आहे.