'आज सर्वात पवित्र दिवस, इतिहास घडतोय', अयोध्येत पोहोचलेलं अंबानी कुटुंब भावूक

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मुकेश अंबानी यांच्यासह कुटुंबाने हजेरी लावली. यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.   

शिवराज यादव | Updated: Jan 22, 2024, 01:36 PM IST
'आज सर्वात पवित्र दिवस, इतिहास घडतोय', अयोध्येत पोहोचलेलं अंबानी कुटुंब भावूक title=

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संपूर्ण देशरातील मान्यवरांनी हजेरी लावली आहे. उद्योग जगतापासून ते मनोरंजन क्षेत्रापर्यंतच्या मान्यवरांची मांदियाळीच अयोध्येतील ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होण्यासाठी पोहोचली होती. देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक असणारे मुकेश अंबानी यांनीही कुटुंबासह हजेरी लावली. मुकेश अंबानी यांच्यासह त्यांच्या पत्नी नीता अंबानी, मुलगा आकाश-अनंत अंबानी आणि सून श्लोका मेहताही होत्या. या क्षणी रिलायन्स चेअरमनचे मुकेश अंबानी यांनी 'भगवान राम येत आहेत,' अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. 

रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्यासह पत्नी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी अयोध्येत पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी हात जोडून प्रभू श्रीरामाचं नमन केलं. यावेळी मुकेश अंबानी म्हणाले की, भगवान श्रीराम येत आहेत. 22 जानेवारीला संपूर्ण देशात राम दिवाळी होईल. 

'हा ऐतिहासिक दिवस'

नीता अंबानी यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की, आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक आहे. नीता अंबानी यांचा उत्साह यावेळी ओसांडून वाहत होता. हात जोडूनच त्यांनी मंदिरात प्रवेश केला. 

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासह त्यांचा मोठा मुलगा आणि रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे चेअरमन आकाश अंबानी आपली पत्नी श्लोका मेहतासह सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी पोहोचले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त करताता आकाश अंबानीने सांगितलं की, "हा दिवस इतिहासाच्या पानात लिहिला जाईल. आज येथे येऊन आम्ही प्रचंड आनंदी आहोत".

दरम्यान ईशा अंबानी आपला पती आनंद पिरामलसह पोहोचली होती. यावेळी तिने आपण आज प्रचंड आनंदी असल्याचं सांगितलं. तर आनंद पिरामलने 'जय श्रीराम' अशी घोषणा दिली.