वैभव नाईक यांनी मागितली विनायक राऊतांची माफी, कारण...

विनायक राऊत यांच्या पराभवाबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जाहीररित्या माफी मागितली. 

Updated: Jun 16, 2024, 02:32 PM IST
वैभव नाईक यांनी मागितली विनायक राऊतांची माफी, कारण... title=

Vaibhav Naik Apologies Vinayak Raut : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे विजयी झाले आहेत. नारायण राणे यांना 4 लाख 48 हजार 514 मते मिळाली. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विनायक राऊत यांना 4 लाख 656 मते मिळाली. नारायण राणेंनी जवळपास 47 हजारांहून अधिक मताधिक्य मिळवून विनायक राऊतांवर विजय मिळवला. विनायक राऊत यांच्या पराभवाबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जाहीररित्या माफी मागितली. 

लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या पराभवानंतर मालवणमध्ये महाविकासआघाडीची चिंतन बैठक पार पडली. या बैठकीत पदाधिकारी - कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जाहीर माफी मागितली आहे. या बैठकीत भाषण करताना आमदार वैभव नाईक यांनी विनायक राऊत यांची माफी मागितली. वैभव नाईक हे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार आहे. हा मतदारसंघ वैभव नाईक यांचा गड म्हणून ओळखला जातो.

वैभव नाईक यांची मागितली माफी

मात्र लोकसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदारसंघात विनायक राऊत यांना अपेक्षेपेक्षा कमी मत मिळाली. विशेष म्हणजे याच मतदारसंघातून नारायण राणेंना लीड मिळालं. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांच्यावर जोरदार टीका होत होती. यामुळे शिवसैनिकांसह अनेकांना आश्चर्याचा धक्का मिळाला होता. अशातच आता पार पडलेल्या बैठकीत विनायक राऊत यांची उपस्थिती पाहून वैभव नाईक यांनी त्यांची जाहीरपणे माफी मागितली आहे.  

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नारायण राणे यांना मताधिक्य

दरम्यान विधानसभेच्या दोन निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाचा वाचपा नारायण राणे यांनी लोकसभा निवडणुकीत घेतला. राणेंसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठीत मानली जात होती. आपल्या वडिलांसाठी राणेंचे दोन्ही पुत्र मैदानात उतरले होते. त्यांच्या प्रचाराचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याचा फायदा अखेर राणेंना झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नारायण राणे यांना मताधिक्य मिळेल.

तर रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांमधून विनायक राऊत यांना आघाडी मिळेल, हे गणित आधीपासूनच अपेक्षित धरले जात होते. मात्र रत्नागिरीतील तीनही मतदार संघात विनायक राऊत यांना मिळालेल्या आघाडीपेक्षा अधिक आघाडी नारायण राणे यांना सिंधुदुर्गातील तीनही मतदारसंघांमधून मिळाली. सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली या तीनही मतदारसंघांमधून नारायण राणे यांना प्रत्येक फेरीमध्ये मोठी आघाडी मिळाली. त्यामुळे नारायण राणे यांचा विजय झाला.