Crime News Today: राजस्थानातील करौली जिल्ह्यात 25 दिवसांपूर्वी 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी मुलीच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. अल्पवयीन मुलीचे आईसोबत वाद झाल्यानंतर तिनेच स्वतःला पेटवून घेतले होते.मात्र, त्यानंतर आई-वडिलांनीच तिला विष देऊन तिची हत्या केली. त्यांच्या या कटात मुलीचा मामादेखील सामील होता. पोलिसांनी या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांना आणि मामाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळांजवळ एक 10 वर्षांची मुलगी जळालेल्या अवस्थेत सापडली होती. त्यानंतर तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखस करण्यात आलं होतं. मात्र, तिच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नसल्याने तिला जयपुरच्या रुग्णालयात नेले. मात्र 19 मे रोजी तिचा मृत्यू झाला. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात पोलिसांना चकवा देण्यासाठी एका मुलाला फसवण्याचा कट रचला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळं हा कट फसला आहे.
मुलीच्या नातेवाईकांनी सुरुवातीला मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा केला होता. बलात्कारानंतर मुलीला रेल्वे रुळांजवळ फेकण्यात आले, असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणी गावकऱ्यांनी विविध आंदोलन करत आरोपीला अटक करण्याची मागणी केली. मुलीच्य वडिलांनी गावीतीच एका युवकावर याचा आळ घेतला. मुलीवर पेट्रोल टाकून तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप मुलीच्या घरच्यांनी केला होता. तसंच, काही तरुणांची नावं देखील घेतली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचा कोणताही पुरावा सापडला नाहीये. त्याउलट जयपूरमध्ये मुलीवर उपचार सुरु असताना तिच्या कुटुंबीयांनी तिला किटकनाशक प्यायले दिले. त्यानंतर 24 तासांतच तिची तब्येत बिघडली.कुटुंबीयांनी तिला ऑक्सिजन सपोर्ट देण्यासही विरोध केला. त्यामुळं मुलीचा मृत्यू झाला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्येही याची नोंद झाली आहे. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तेव्हा कुटुंबीयांकडे संशयाची सुई फिरली.
अल्पवयीन मुलीचं तिच्या आईसोबत वाद झाले होते. त्यानंतर तिने रागाच्या भरात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतलं. मात्र, कुटुंबीयांनी ही घटना लपवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतःच मुलीला रेल्वे रुळांजवळ नेऊन ठेवले. नंतर गदारोळ माजल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला. नंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले व अज्ञात लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळं हा कट उघडकीस आला आहे.