Ujjain Mahakal temple : मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील महाकाल मंदिराच्या गर्भगृहात भीषण अपघात झालाय. उज्जैनच्या ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिरात सोमवारी सकाळी भस्म आरतीदरम्यान गर्भगृहात अचानक आग लागली. या आगीत 13 हून अधिक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. भस्म आरतीच्या वेळी अबीर-गुलाल उधळत असताना ही आग लागली. आगीत जखमी झालेल्या सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी नीरज सिंह आणि पोलीस अधीक्षक प्रदीप शर्मा घटनास्थळी पोहोचले होते. महत्त्वाची बाब म्हणजे जखमी झालेल्या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मंदिरात गुलाल उधळत असताना अचानक आग लागल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे.
या आगीच्या घटनेत डझनभर पुजारी भाजल्याचे समोर आलं आहे. काही पुजाऱ्यांवर उज्जैनच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी इंदौरला पाठवण्यात आलं आहे. महाकाल मंदिरातील भस्मर्तीचे मुख्य पुजारी. डॉ. संजय गुरू, विकास पुजारी, मनोज पुजारी, अंश पुरोहित, सेवक महेश शर्मा, चिंतामण गेहलोत आणि इतर या आगीत जखमी झाले आहेत. आगीच्या घटनेनंतर भाविकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं.
जगप्रसिद्ध अशा महाकालेश्वर मंदिरात होळी सणानिमित्त ब्रह्म मुहूर्तावर भस्म आरतीच्या वेळी सकाळी 4 वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. कोटीतीर्थाच्या तलावाच्या पाण्याने महाकालाला अभिषेक केल्यानंतर दूध, दही, तूप, साखर आणि ताज्या फळांच्या रसाने पंचामृत पूजा अभिषेक करण्यात आला. भांग चंदनाच्या सुक्या मेव्याने बाबा महाकाल यांचा दिव्य श्रृंगार करण्यात आला. यानंतर महाकालेश्वर मंदिराच्या मुखी बाबा महाकाल यांच्यावर खास अस्थिकलशाचा शिडकावा करण्यात आला आणि अस्थिकलशानंतर मंदिराच्या पुजाऱ्याच्या हस्ते धूप प्रज्वलन सोहळा सुरू करण्यात आला. त्यानंतर पुजाऱ्यांनी बाबा महाकालसह होळीचा सण साजरा केला. श्री महाकालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात गुलाल उधळण्यात आला. होळीच्या भस्म आरतीत सहभागी झालेले भाविकही रंगात भिजलेले दिसले. त्यानंतर अचानक आग लागली.
कशी लागली आग?
महाकाल मंदिरातील गर्भगृहाच्या भिंती आणि छतावर चांदीचा लेप आहे. होळीच्या सणानिमित्त बाबा महाकालला गुलाल अर्पण करतात आणि पुजारीही एकमेकांना रंग लावतात. हे रंग गर्भगृहाच्या भिंतींना लागून ते खराब होऊ नयेत यासाठी यंदा शिवलिंगावर प्लास्टिकचे फ्लेक्स लावण्यात आले होते. त्यानंतर गर्भगृहात एकमेकांवर रंगांचा वर्षाव करण्यात येत होता. मात्र या भस्म आरतीच्या वेळी थाळीत जळणाऱ्या कापूरवर गुलाल उधळला गेला, त्यामुळे कापूराने आणि फ्लेक्सने पेट घेतला. रंगाची उधळण होत असतानाच हा प्रकार घडल्याने गर्भगृहात घबराट उडाली. मात्र, काही वेळातच आग आटोक्यात आल्याने अनर्थ टळला.