नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, देशात आतापर्यंत 2 कोटीहून अधिक कोरोना चाचण्या केल्याची माहिती मंगळवारी दिली. गेल्या 24 तासात देशात 6 लाख 60 हजार चाचण्या करण्यात आल्या. देशात रिकव्हर झालेल्या अर्थात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या, ऍक्टिव्ह रुग्ण संख्येहून दुप्पट असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
देशात 25 मार्चपासून आतापर्यंत पहिल्यांदा कोरोना मृत्यूदर सर्वात कमी 2.10 टक्के इतका झाला आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मृत्यूदर 3.36 टक्के होता. तर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मृत्यूदर कमी होऊन 2.69 टक्के इतका झाला. सध्या देशात 5 लाख 86 हजार 298 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी 68 टक्के पुरुषांचा आणि 32 टक्के महिलांचा मृत्यू झाला आहे. 50 टक्के मृत्यू 60 आणि त्याहून अधिक वयवर्षे असलेल्या रुग्णांचा झाला आहे. तर 37 टक्के मृत्यू 45 ते 60 वयोगटातील रुग्णाचा झाला आहे. सरकारने 60 हजार व्हेटिंलेटरची ऑर्डर दिली असून यापैकी केंद्र आणि राज्यातील मिळून 700 रुग्णालयांमध्ये 18 हजार व्हेंटिलेटर पुरवण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे हे सर्व व्हेटिंलेटर मेक इन इंडिया, असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, आयसीएमआर डीजी बलराम भार्गव म्हणाले की, भारतात तीन लसींच्या चाचण्या सुरू आहेत. परंतु लस विकसित होण्यास वेळ लागेल. तिन्ही लस वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. त्यांनी सांगितलं की, भारत बायोटेकने लशीचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. तर Zydus कॅडिलाची लस फेज 2 ट्रायलमध्ये आहे.