शिलाँग : त्रिपूरानंतर मेघालयमधील विधानसभा निवडणुकीचेही चित्र स्पष्टपणे पुढे येताना दिसत आहे. त्यामुळे मेगालयच्या राजकीय वर्तुळात नाट्यमय घडामोडींनी वेग घेतला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालनुसार मेघालयमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. पण, बहुमताच्या आकड्यापासून काँग्रेस काहीशी दूर आहे. त्यामुळे राजकीय रणनिती आखताना चूक होऊ नये आणि गोव्याची पुनरावृत्ती घडू नये, यासाठी काँग्रेस कामाला लागली आहे. म्हणूनच तर, मेघालयच्या सत्तेवर पकड मिळविण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे दूत मेघालयची राजधानी शिलॉंगला रवाना झाले आहेत.
कांग्रेस - २१
बीजेपी - ६
यूडीपी - ६
एनपीपी - १४
अन्य - ११
दरम्यान, भाजपने दावा केला आहे की, मेघालयमध्ये जरी काँग्रेस सर्वाधीक जागा जिंकून मोठा पक्ष ठरला असला तरी, इतर पक्षांच्या मदतीने भाजप मेघालयमध्ये आघाडीचे सरकार स्थापन करेन. मेघालयातील त्रिशंकू स्थितीचा विचार करता सत्ताकारण कोणत्याही बाजूने वळण घेऊ शकते. त्यामुळे काँग्रेसने आतापासूनच रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे.
प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार, काँग्रेसचे प्रमुख रणनितीकार आणि सोनिया गांधी यांचे अत्यंत विश्वासू आणि राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्यासह अन्य दोन बडे नेते मेघालयला रवाना झाले आहेत. मेघालयमध्ये गेली ९ वर्षे काँग्रेस सत्तेत आहे. त्यामुळे आपला गढ कायम राखण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करत असून, दिवंगत पीए संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) सोबत चर्चा करत आहे.
दरम्यान, राजकीय वर्तुळातील चर्चा अशी की, सध्याचे राजकीय वातावरण आणि केंद्रातील सरकार यांचा विचार करता एनपीपी भाजपसोबत जाईल. नेमका हाच धोका ओळखून एनपीपाला आपल्यासोबत ठेवण्यासाठी काँग्रेस निकराचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी एनपीपीवरील दबावही वाढला आहे.