राज्यातला सत्तासंघर्ष दिल्लीत, सोनिया गांधींची काँग्रेस नेत्यांसोबत बैठक

महाराष्ट्रातला सत्तास्थापनेचा संघर्ष आता दिल्लीला पोहोचला आहे. 

Updated: Nov 19, 2019, 05:46 PM IST
राज्यातला सत्तासंघर्ष दिल्लीत, सोनिया गांधींची काँग्रेस नेत्यांसोबत बैठक title=

नवी दिल्ली : महाराष्ट्रातला सत्तास्थापनेचा संघर्ष आता दिल्लीला पोहोचला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे आणि ए. के. अँटनी यांनी १० जनपथवर जाऊन मंगळवारी सोनिया गांधींशी चर्चा केली. या चर्चेचा तपशील समजू शकलेला नाही. काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर आता उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीमध्येच बैठक होणार आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होईल. या बैठकीला राष्ट्रवादीकडून पवारांसह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार आणि जयंत पाटील असणार आहेत. तर काँग्रेसकडून सोनियांसह के सी वेणूगोपाल, ए के अँटोनी, मल्लिकार्जुन खरगे आणि बाळासाहेब थोरात असतील. पण उद्याच्या बैठकीचा अजून निरोपच आला नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

राज्यातल्या राजकीय परिस्थितीची माहिती देण्यासाठी कालच शरद पवार यांनी सोनिया गांधींची भेट घेतली. पण या भेटीत शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं. सोनिया गांधी आणि शरद पवार यांची भेट झाल्यानंतर आजच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होती, पण काँग्रेसने आजची बैठक रद्द केल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं. इंदिरा गांधींची जयंती असल्यामुळे काँग्रेस नेत्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमांना जायचं आहे, त्यामुळे ही बैठक उद्या होणार असल्याचं नवाब मलिक म्हणाले.