राजीनामा देण्यासाठी... सिंधियांच्या निर्णयावर मुलाची पहिली प्रतिक्रिया

त्याने केलेलं हे ट्विटही बरंच चर्चेत आहे.   

Updated: Mar 10, 2020, 08:08 PM IST
राजीनामा देण्यासाठी... सिंधियांच्या निर्णयावर मुलाची पहिली प्रतिक्रिया title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

भोपाळ : मध्य प्रदेशच्या राजकारणात सुरु असणाऱ्या घडामोडींनी असा काही वेग पकडला आहे, की साऱ्या देशभरात याच मुद्द्याने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. काँग्रेस पक्षातील एक वजन असणारं नाव म्हणजेच ज्योतिरादित्य सिंधिया Jyotiraditya Scindia यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय़ घेतला. 

सिंधिया यांच्यावर काँग्रेसकडून पक्षविरोधी कारवाईचा ठपकाही ठेवण्यात आला. मुख्य म्हणजे काँग्रेसमधून सिंधिया यांनी काढता पाय घेतल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ एक फळीच पक्षातून बाहेर निघाली. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. राजकीय पटलावर सुरु असणाऱ्या या सर्व घडामोडी पाहता आता सिंधिया यांच्याशी अतिशय जवळचं नातं असणाऱ्या एका व्यक्तीने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

ही व्यक्ती म्हणजे सिंधिया यांचा मुलगा, महाआर्यमान सिंधिया. महाआर्यमानने आपल्या वडिलांच्या या अतिशय महत्त्वाच्या निर्णयानंतर एक ट्विट करत त्यांचा अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली. वडिलांच्या समर्थनार्थ त्याने केलेलं हे ट्विटही बरंच चर्चेत आहे. 

'स्वत:साठी खंबीर निर्णय घेणाऱ्या वडिलांचा मला अभिमान आहे. एका प्रस्थातून काढता पाय घेत राजीनामा देण्यासाठीही धाडस लागतं. इतिहासच याविषयी सारंहाकाही सांगून जात आहे की माझ्या कुटुंबाला केव्हाही सत्तेची भूक नव्हती. वचन दिल्याप्रमाणे आम्ही भारतात, मध्य प्रदेशात किंवा जिथे कुठे आमचं भविष्य असेल तिथे परिणामकारक बदल घडवून आणू', असं त्याने ट्विटमध्ये लिहित वडिलांच्या समर्थकांना विश्वास देऊ केला. 

महाआर्यमानचं हे ट्विट पाहता आपल्या वडिलांसोबत तो या साऱ्या वातावरणात खंबीरपणे त्यांचा आधार होऊन असल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान, काँग्रेसमधून काढता पाय घेणारे ज्योतिरादित्य सिंधिया येत्या काळात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का आहे.