तीन महिन्यांत पोट कमी करा नाहीतर...; मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना अल्टीमेटम

Assam Police : या वर्षी नोव्हेंबरपर्यंत पोटोचा आकार कमी करा किंवा स्वेच्छानिवृत्ती घ्या असे आदेश आसाम पोलिसांनी वरिष्ठ अधिकार्‍यांसह आपल्या कर्मचार्‍यांना जारी केलेल्या नवीनतम निर्देशांमध्ये  दिले आहेत.आसामच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष्य घातल्यानंतर पोलीस महासंचालकांनी हा निर्णय घेतला आहे.

आकाश नेटके | Updated: May 16, 2023, 06:26 PM IST
तीन महिन्यांत पोट कमी करा नाहीतर...;  मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना अल्टीमेटम title=

Assam News : आसाम सरकार (Assam Government) आता लठ्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वैच्छिक सेवानिवृत्ती (VRS) देणार आहे. आसाम पोलीस विभागाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचा फिटनेस सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) तपासला जाईल आणि ज्यांचे वजन जास्त असेल त्यांना व्हीआरएस दिला जाईल. आसामचे पोलीस महासंचालक (DGP) जीपी सिंह यांनी ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा (hemanta biswas sharma) यांच्या आदेशानंतर हा निर्णय घेतला गेला आहे, असे जीपी सिंह यांनी सांगितले.

"आम्ही सर्व अधिकारी आणि पोलिसांना 15 ऑगस्टपर्यंत वेळ देत आहोत, त्यानंतर आम्ही पुढील 15 दिवसांत बीएमआय मूल्यांकन सुरू करू," असे पोलीस महासंचालक जीपी सिंह यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्याकडेच गृहखाते असल्याने त्यांनी यामध्ये स्वतःहून लक्ष घातले आहे. आसामच्या सर्व पोलिसांच्या आरोग्याची चाचणी केली जाईल असेही जीपी सिंह यांनी म्हटले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर आसामच्या पोलीस महासंचालकांनी मंगळवारी सगळ्यात आधी त्यांचा बीएमआय तपासला. जे लोक मूल्यांकनात लठ्ठ श्रेणीत आढळतील, त्यांना वजन कमी करण्यासाठी तीन महिन्यांचा  वेळ दिला जाईल. यानंतर त्यांना स्वैच्छिक सेवानिवृत्ती चा पर्याय दिला जाईल. मात्र यामध्ये थायरॉईडसारख्या आजाराने ग्रस्त असलेल्यांचा समावेश होणार नाही, असे जीपी सिंह यांनी स्पष्ट केले.

"आम्ही तीन महिन्यांचा वेळ देतो आहोता.  15 ऑगस्टपर्यंत सर्व लोकांना तंदुरुस्त व्हावे लागेल. त्यानंतर 15 दिवसांत बॉडी मास इंडेक्स सर्वेक्षण होईल. या सर्वेक्षणात ज्या लोकांचे वजन वाढलेले आढळून येईल, त्यांच्यासाठी परिस्थिती कठीण असणार आहे. ज्या लोकांचा बॉडी मास इंडेक्स 30 पेक्षा जास्त असेल, त्यांना वजन कमी करण्यासाठी नोव्हेंबरपर्यंत आणखी तीन महिने वेळ मिळेल," असेही पोलीस महासंचालक म्हणाले. यानंतरही हे लोक वजन कमी करू शकले नाहीत तर त्यांना नोकरीतूनच काढून टाकले जाऊ शकते, असाही इशारा देण्यात आला आहे.

दुसरीकडे, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी 30 एप्रिल रोजीच घोषणा केली होती की जे पोलीस लठ्ठ आहेत किंवा दारूचे व्यसन आहेत त्यांना व्हीआरएस दिला जाईल. एवढेच नाही तर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेल्यांना व्हीआरएसही देण्यात येणार आहे. पीटीआयनुसार, आसाम पोलिसांनी 650 पोलिसांची यादी तयार केली आहे. यामध्ये दारूचे व्यसन असलेले, लठ्ठ आणि कामासाठी अयोग्य अशा पोलिसांचा समावेश आहे.