मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीचे राजकारण 'चौकीदार' या शब्दाभोवती फिरताना पाहायला मिळत आहे. देशासमोरील महत्त्वाचे प्रश्न बाजूला राहून कोण चौकीदार आणि कोण चोर ? हेच प्रश्न सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना विचारत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मी देशाचा चौकीदार आहे या वक्तव्याला विरोधी पक्षांनी 'चौकीदार चोर है' या मोहिमेने उत्तर दिले. यानंतर भाजपातर्फे 'मै भी चौकीदार' मोहिमेने सुरूवात केली आहे. पंतप्रधानांसहित भाजपाच्या सर्वच नेत्यांनी सोशल मीडियावरील आपल्या नावापुढे चौकीदार हे बिरूद लावले. त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही स्वत:च्या नावापुढे चौकीदार लावले. पण मुळात हा चौकीदार शब्द आला कुठून ? या शब्दाला काय इतिहास आहे ? याबद्दल आपण जाणून घेऊया.
चौकीदार हा शब्द उर्दूच्या चौकी या शब्दातून आला आहे. जुन्या काळामध्ये गावच्या सीमेवर एक चौकी असायची. जिथून साऱ्या गावावर नजर ठेवली जात असे. गावामध्ये कोणी चोर, दरोडेखोर घुसू नये म्हणून या चौकीची मदत व्हायची. उर्दू शब्द चौक (चौकी) आणि दार ( देखभाल करणारा) हे मिळून चौकीदार शब्द बनला. प्राचीन भारतात चौकीदार प्रयोग होत असे. पण मुघलांनी याला एक सिस्टिम आणली. त्यांनी शासकिय आणि प्रत्येक गावावर चौकीदाराची नियुक्ती केली. त्यांचा पगार आणि कामाचे नियोजन आखून देण्यात आले. गावाच्या सीमा ठरवून देण्यात आल्या. त्यामुळे तसं पहायला गेल्यास हा शब्द 1200 वर्षे जुना आहे. मुघलांनंतर इंग्रजांनी चौकीदार परंपरा कायम ठेवली. स्वातंत्र्यानंतर देशातही 70 वर्षांहून अधिक काळही परंपरा कायम आहे. गावांमध्ये अजूनही चौकीदार महत्त्वाची भूमिका बजावतात.
कायदा व्यवस्था सुस्थितीत ठेवण्यात चौकीदाराची भूमिका महत्त्वाची असते. ते पोलिसांना सूचना देतात तसेच परिसरावर देखरेखही ठेवतात. अजूनही गाव खेड्यांमध्ये पोलीस गावच्या सीमेवर चौकीदार नेमतात. गावांमध्ये होणाऱ्या गुन्ह्याची माहीती आधी यांना मिळते असेही म्हणतात. आता शहरातील प्रत्येक सोसायटी बाहेर आपल्याला चौकीदार दिसतो. जो इमारतीमध्ये फेरीवाल्यांना येण्यास मज्जाव करतो.