नीरव मोदीच्या अटकेवर प्रियंका गांधींची प्रतिक्रिया

प्रियंका गांधी यांनी आपली प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

Updated: Mar 20, 2019, 09:08 PM IST
नीरव मोदीच्या अटकेवर प्रियंका गांधींची प्रतिक्रिया  title=

नवी दिल्ली : पीएनबी बँकेचे १३ हजार कोटी बुडवून फरार झालेल्या नीरव मोदीला अखेर लंडनमध्ये अटक झाली. नीरवला लंडनमध्ये वेस्टमिनिस्टर पोलिसांनी अटक केली. भारताच्या विनंतीनुसार अटकेची कारवाई करण्यात आली असून त्याला स्थानिक कोर्टात हजर करण्यात आले. या अटकेमुळे त्याच्यावर कायदेशीर खटल्याला आता सुरूवात झाली आहे. नीरव मोदी भारतात परतण्याच्या आशा पल्लवीत झाल्याने भाजपा सरकारने स्वत:ची पाठ थोपटून घेण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आपली प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तीन दिवसांच्या गंगा यात्रेसाठी त्या मिर्झापूरहून रामनगर आणि आता बनारसला पोहोचल्या आहेत. जनता मुर्ख आहे असे पंतप्रधानांनी समजू नये असे त्या यावेळी म्हणाल्या. 

नीरव मोदीला अखेर लंडनमध्ये अटक

भाजपा सरकार नीरव मोदीच्या अटकेला स्वत:चा विजय मानत आहे. खरचं हा विजय आहे का ? असा प्रश्न प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे. तसेच नीरवला देशाबाहेर कोणी पाठवले ? हे विचारत त्यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला.  आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी केवळ स्वत:च्या फायद्याचा विचार करून मतदान करावे, असे आवाहन प्रियंका गांधी यांनी केले. यावेळी त्यांनी म्हटले की, तुम्ही सध्या इतरांच्या फायद्यासाठी मतदान करत आहात. मात्र, मतदान करताना तुम्ही स्वत:चा फायदा लक्षात घेणे गरजेचे आहे. राजकारण हे जनतेच्या कल्याणासाठी असले पाहिजे. काँग्रेस पक्ष अशाप्रकारचे सर्वसमावेशक राजकारण करत असल्याचेही प्रियंका यांनी सांगितले. 

भारतात प्रत्यार्पण प्रकरणाची सुनावणी आता न्यायालयात केली जाणार आहे. याचदरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाकडून नीरव मोदीची संपत्ती विकली जाऊ शकते. सुनावणीदरम्यान नीरव मोदीने जामिनासाठी विनंती केली. तपास यंत्रणांना आपले पूर्ण सहकार्य राहील. प्रवासासंबंधीचे सर्व कागदपत्रे मी सादर करेन, असे त्याने न्यायालयाला सांगितले. मात्र, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे त्याचा मुक्काम हा तुरुंगात असणार आहे. वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने भारताच्या अंमलबजावणी संचालनालयाकडून प्रत्यार्पण अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर अटक वॉरंट लागू केले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.