एक्झिट पोल त्वरीत हटवा, निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

निवडणूक आयोग सर्व निवडणूक अंदाज (एक्झिट पोल) वर नजर ठेवून असणार आहे.

Updated: May 16, 2019, 08:45 AM IST
एक्झिट पोल त्वरीत हटवा, निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश  title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानास तीन दिवस बाकी आहेत. मतदानाचे टप्पे संपल्यानंतर देशभरातून निवडणूक अंदाज येण्यास सुरुवात होईल. पण यावेळेसही निवडणूक आयोग सर्व निवडणूक अंदाज (एक्झिट पोल) वर नजर ठेवून असणार आहे. निवडणूक अंदाज जारी करणाऱ्या मीडिया संस्थांना या संदर्भात नोटीस पाठवण्यात आली आहे. सोशल मीडियातून निवडणूक अंदाज समोर आणणाऱ्यांवर निवडणूक आयोग लक्ष असणार आहे. निर्वाचन आयोगाने मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरलाही एक्झिट पोल हटवण्याचे आदेश दिले. निवडणूक आयोगाने यासंदर्भातील निर्देश कसे दिले यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आली नाही. पण निवडणूक आयोगाने ट्विरला एक एक्झिट पोल संदर्भातील ट्विट हटवण्यास सांगितले. 

निवडणूक आयोगाकडे तक्रार आल्यानंतर याप्रकारचे आदेश ट्विटरला देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित यूजरने नंतर हे ट्विट हटवल्याचेही समोर आले आहे. निवडणूक आयोगाकडून असे कोणते आदेश देण्यात आले नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याच्या एक दिवस आधीच निवडणूक आयोगाने निकालांचे अंदाज दाखवणाऱ्या 3 माध्यम संस्थांना कारणे दाखवा नोटीस जारी केले होते. 

निवडणुकीच्या आचार संहिते बाबत निर्वाचन आयोग सक्रिय असलेले पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये अमित शाह यांच्या रोड शोत झालेल्या हिंसाचारानंतर अंतिम टप्प्यातील मतदानाआधी प्रचार सभेवर बंदी घालण्यात आली. शेवटच्या टप्प्यातील मतदान 19 मे ला होणार आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सहित 8 राज्यांमध्ये 17 मे संध्याकाळ पर्यंत प्रचार होणार होता. पण मंगळवारी कोलकातामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने 16 मेच्या रात्री 10 नंतर निवडणूक प्रचारास बंदी घातली आहे. 16 मेला बंगालमध्ये पंतप्रधान मोदींच्या दोन प्रचार सभांना मंजूरी देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे.