लॉकडाऊन-२ : सोमवारपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्टेशनरीची ऑनलाइन विक्री सुरु

 सोमवारी २० एप्रिलपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्टेशनरीची ऑनलाइन विक्री सुरु होण्याचे संकेत मिळाले आहेत. 

Updated: Apr 17, 2020, 08:52 AM IST
लॉकडाऊन-२ : सोमवारपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्टेशनरीची ऑनलाइन विक्री सुरु title=

मुंबई : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन प्रथम २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले. हे लॉकडाऊन १४ एप्रिला संपणार होते. मात्र, कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन आणि कोरोनाची साखळी मोडण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा लॉकडाऊन-२ लागू केले. या लॉकडाऊनमुळे १९ दिवसांची अधिक भर पडली असून ३ मेपर्यंत हे लॉकडाऊन कायम असणार आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रार्दुभाव कमी आहे. त्याठिकाणी राज्यांनी आढावा घेऊन २० एप्रिलपासून काही सेवा सुरु कराव्यात, असेही सांगण्यात आले. त्यामुळे आता सोमवारी २० एप्रिलपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्टेशनरीची ऑनलाइन विक्री सुरु होण्याचे संकेत मिळाले आहेत. तसेच उद्योग-व्यापार सुरु करण्याबाबतही हालचाल सुरु झाली आहे.

२० एप्रिलपासून मोबाईल फोन आणि काही इलेक्ट्रिक वस्तूंच्या ऑनलाईन विक्रीला सरकारने परवानगी दिली आहे. लॉकडाऊनच्या  सुधारित मार्गदर्शक सूचना केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी जारी केल्या आहेत. यात ही परवानगी देण्यात आली. यामुळे अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील यांसारख्या ऑनलाईन संकेतस्थळांवरुन मोबाईल फोन, टीव्ही, फ्रीज, लॅपटॉप आणि अन्य स्टेशनरी वस्तू खरेदी करता येणार आहेत. 

केंद्रीय गृहसचिव अजय भाल्ला यांनी वाढीव लॉकडाऊन कालावधीसाठी ३ मेपर्यंत सुधारित मार्गदर्शक सूचना दिल्यानंतर एक दिवसानंतर गृहमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिका ऱ्याने हे स्पष्टीकरण दिले. तसेच बुधवारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, विस्तारित लॉकडाऊन दरम्यान व्यावसायिक आणि खासगी आस्थापनांना ऑपरेट करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने तैनात केलेल्या वाहनांसाठी संबंधित परवानगी घ्यावी असे गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यानंतरच अशा वाहनांना वाहतुकीची परवानगी मिळणार आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळातील नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे.