नवी दिल्ली : काँग्रेस मंत्रिमंडळाची यादी आज दिल्लीत ठरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. पृथ्वीराज चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींकडून आज याबाबत हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील तिढा अजूनही कायम आहे. राज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसच्या यादीवर दिल्लीत जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. अशोक चव्हाण, अमित देशमुख, यशोमती ठाकूर यांचं नाव मंत्रिपदासाठी निश्चित झाल्याचं बोललं जात आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात दिल्लीत दाखल झाले आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन ते मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करणार आहेत. त्यामुळे आता कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे लक्ष लागलं आहे. सोनिया गांधींनी काँग्रेसच्या यादीला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा होणार आहे.