बीजिंग : कोरोना व्हायरसमुळे संकटात सापडलेल्या चीनला आणखी एक धक्का लागला आहे. मोबाईल बनवणारी कंपनी लावा त्यांचं संपूर्ण उत्पादन भारतात हलवण्याच्या तयारीत आहे. पुढच्या ५ वर्षांमध्ये लावा भारतात ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, असं लावा कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.
'लावा कंपनी मोबाईल आर ऍण्ड डी, डिझाईन आणि उत्पादन भारतात करणार आहे. या संधीची आम्ही वाट बघत आहोत', अशी प्रतिक्रिया लावा कंपनीचे भारताचे अध्यक्ष हरी ओम राय यांनी इकोनॉमिक टाईम्सशी बोलताना दिली. पुढच्या ६ महिन्यांमध्ये लावा भारतात ८० कोटी रुपये गुंतवणूक करेल, असंही हरी ओम राय यांनी सांगितलं.
कोरोनाच्या संकटात सरकारने उद्योजकांसाठी सुविधा आणि सूट (प्रॉडक्शन लिंक्ड इनसेनटिव्हस) द्यायचा निर्णय घेतला आहे. जागतिक पुरवठादारांना यातून फायदा होईल, असा विश्वास सरकारला आहे.
'सरकारच्या सूट आणि सुविधेमुळे आम्ही जागतिक मागणीनुसार पुरवठा करू शकतो, त्यामुळे आम्ही चीनमधून भारतात येण्याची रणनिती आखली आहे. संपूर्ण उत्पादन भारतात हलवायला वेळ लागेल. संपूर्ण स्थलांतर मागणी आणि जागतिक बाजारात आम्हाला किती भागिदारी मिळवण्यात यश येतं, यावर अवलंबून आहे,' असंही राय म्हणाले.
लावाच्या चीनमधल्या उत्पादन सुविधा या आऊटसोर्स आहेत. तर चीनमधल्या आर ऍण्ड डी तसंच डिझाईन सुविधा या कंपनीच्या मालकीच्या आहेत. भारतात आम्ही स्थानिक आणि निर्यातीची मागणी पूर्ण करू शकतो, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला.