नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या संकट समयी तामिळनाडू सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घतला आहे. तामिळनाडू राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून वाढवून ५९ वर्षे केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा तब्बल १३ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री इ. के. पलानीस्वामी यांनी या निर्णयाची घोषणा केली. हा निर्णय फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आला आहे.
यामध्ये सरकारी कर्मचारी, शिक्षक, प्रध्यापक आदींचा समावेश आहे. कोरोना काळात सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढविण्याची घोषणा तातडीने अंमलात येणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. म्हणजे ३१ मे पूर्वी जे कर्मचारी निवृत्त होणार होते त्यांनाच फक्त या निर्णयाचा फायदा होणार आहे. यामध्ये फक्त राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबवण्यासाठी आणि संक्रमित रुग्णांच्या वाढत्या संख्येवर उपचार करण्यास मदत होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोरोनाच्या संकटामुळे देशातील बहुतांशी राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशात लॉकडाऊन केल्यानं उद्योग, व्यापार ठप्प झाला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद असल्यानं अर्थव्यवस्था अडचणीत सापडली आहे.