लालूप्रसाद यादवांचा जावई थाट! मेहुणा स्वागताला न आल्याने नाराज; गाडीतून खाली उतरण्यास नकार

लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आपल्या सासरी गेले असता त्यांचा जावई थाट पाहण्यास मिळाला. मेहुणा स्वागताला न आल्याने नाराज झालेल्या लालूप्रसाद यादव यांनी गाडीतून खाली उतरण्यास नकार दिला. यानंतर राबडी देवी (Rabdi Devi) यांच्या भावाने हात जोडून त्यांना विनवणी केली.   

शिवराज यादव | Updated: Aug 23, 2023, 03:53 PM IST
लालूप्रसाद यादवांचा जावई थाट! मेहुणा स्वागताला न आल्याने नाराज; गाडीतून खाली उतरण्यास नकार title=

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव राजकारणात आपल्या मजेशीर अंदाजामुळे ओळखले जातात. दरम्यान, लालूप्रसाद यादव नुकतेच आपल्या सासरी पोहोचले होते. यावेळी पुन्हा एकदा त्यांच्या स्वभावाची चुणूक पाहण्यास मिळाली. मेहुणा स्वागताला न आल्याने नाराज झालेल्या लालूप्रसाद यादव यांनी गाडीतून खाली उतरण्यास नकार दिला. यानंतर राबडी देवी (Rabdi Devi) यांच्या कुटुंबीयांची एकच धावपळ सुरु झाली. अखेर राबडी देवीच्या भावाने आणि कुटुंबाने हात जोडून विनवणी केली असता ते खाली उतरले. यावेळी गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. 

लालूप्रसाद यादव तब्बल 7 वर्षानंतर त्यांच्या मूळ गावी फुलवारिया येथे पोहोचले होते. तसंच 10 वर्षांनंतर सासरच्या घऱी गेले होते. सेलार कला गावात जावई लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांना पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती. यावेळी लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी गाडीतच बसले होते. काही मिनिटांनी राबडी देवी यांच्या माहेरच्या महिला आल्या आणि त्यांना आपल्यासोबत घेऊन गेल्या. 

राबडडी देवी यांच्यासह त्यांचे मोठे सुपूत्र प्रताप यादवही निघून गेले. पण लालूप्रसाद अद्यापही गाडीतच बसलेले होते. कारण आपल्या स्वागतासाठी कोणीही आलं नाही यामुळे ते नाराज झाले होते. जोपर्यंत आपला मेहुणा स्वागताला येत नाही तोवर लालूप्रसाद यादव तसेच बसून राहिले होते. 

दरम्यान, आपल्या गावातील जावई नाराज झाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे लालूप्रसाद यादव यांच्या गाडीभोवती गावकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. दुसरीकडे लालू नाराज झाल्याची खबर मिळताच त्यांचा मेहुणा रमाकांत यादव धावत भावोजींच्या गाडीजवळ पोहोचला. यानंतर त्याने लालूप्रसाद यांच्यासमोर हात जोडून त्यांना मनवण्यास सुरुवात केली. 

अखेर काही वेळाने लालूप्रसाद यादव यांनी राग सोडला आणि आपल्या सासरी जाण्यास तयार झाले. पण यावेळीही त्यांचे मेहुणे प्रभूनाथ यादव, साधू यादव आणि सुभाष यादव हे तिघे भाऊ उपस्थित नव्हते. 

लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी जवळपास 45 मिनिटं सेलार कलामधील आपल्या घरात थांबले होते. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी लोकांची भेट घेतली. नंतर राबडी देवी यांच्या नावे उभारण्यात आलेल्या प्लस टू शाळेच्या निरीक्षणासाठी निघून गेले. पण यावेळी लालूप्रसाद यादव यांच्या नाराजीची चांगलीच चर्चा रंगली.